पोलिसांचे (Police) काम देशातील जनतेचे रक्षण करणे आणि त्यांना गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवणे हे आहे. मात्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावणारे प्रकरण समोर आले आहे. लंडनमध्ये (London) एकूण 71 लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका पोलिसाला (लंडन पोलीस) नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत या पोलिसाने 24 महिलांवर बलात्कार (Rape) केला आहे. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी अशाच इतर शेकडो गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे, ज्यात पोलिसांचा सहभाग आहे.
लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांत कार्यरत एका अधिकाऱ्याने 24 बलात्कारांसह 49 लैंगिक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. स्काय न्यूज ब्रॉडकास्टरनुसार, 48 वर्षीय अधिकारी डेव्हिड कॅरिकने आपल्या 18 वर्षांच्या सेवेदरम्यान हे बलात्कार केले. एकूण 12 महिलांवरील बलात्काराचे हे 24 गुन्हे आहेत.
या घडलेल्या घटनांबद्दल महानगर पोलिसांनी माफी मागितली आहे. कॅरिकच्या गर्लफ्रेंडनेही त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डेव्हिड कॅरिक 2001 मध्ये मेट्रोपॉलिटन पोलिसात रुजू झाला. सुरुवातीला मेर्टन आणि बार्नेट येथे प्रतिसाद अधिकारी म्हणून त्याने काम केले. पुढे 2009 मध्ये त्याची संसदीय आणि राजकीय सुरक्षा कमांडमध्ये बदली झाली. अटक आणि निलंबन होईपर्यंत तो त्याच विभागात होता.
डेव्हिड हा ऑनलाइन डेटिंग साइट्स किंवा सोशल इव्हेंटमध्ये महिलांना भेटायचा आणि पोलीस असल्याचा फायदा घेऊन त्यांचा विश्वास संपादित करायचा. डेव्हिडने अनेक महिने आणि वर्षांमध्ये महिलांवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. डेव्हिडला 16 जानेवारी रोजी साउथवॉर्क क्राउन कोर्टात हजर केले गेले. मेट्रोपॉलिटन पोलीस कमिशनर मार्क रॉली यांनी घडल्या प्रकाराबाबत सर्वांची माफी मागितली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी सांगितले की, आता जवळपास 1,000 लैंगिक गुन्हे आणि घरगुती शोषणाच्या दाव्यांचा तपास केला जात आहे, ज्यामध्ये सुमारे 800 अधिकारी सामील आहेत. (हेही वाचा: पूर्व लंडनमधील PureGym मध्ये कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, 46 मिनिटे देत होता मृत्यशी झुंज)
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी डेव्हिड कॅरिकसारख्या लोकांना कधीही पोलिसांत समाविष्ट करू नये, असे म्हटले आहे. या घटनेने पोलिसांची प्रतिमा डागाळली असून लोकांचा विश्वास डळमळीत झाल्याचेही त्यांनी मान्य केले. पीएम सुनक यांनी पोलिसांना महिलांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास सांगितले आहे.