लोकप्रिय जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लेगेरफेल्ड (Karl Lagerfeld) यांचे 19 फेब्रुवारी रोजी, वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. जर्मन क्रिएटिव्ह दिग्दर्शक, फॅशन डिझायनर, कलाकार, छायाचित्रकार आणि कॅरीकॅचर म्हणून ते प्रसिद्ध होते. इतके वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्याने कार्ल महाशयांनी बक्कळ माया जमवली होती. आता इतक्या जास्त संपत्तीचे काय होणार असा प्रश्न पडला असता, एक अचंबित करणारी बाब समोर आली आहे. कार्ल यांच्या संपत्तीमधील तब्बल 14 हजार कोटी रुपयांची संपती त्यांची मांजर Choupette हिला मिळू शकते. ही पांढऱ्या रंगाची मांजर कार्ल यांच्या सर्वात जवळची होती. एका मुलाखतीमध्ये, जर कायद्याने परवानगी दिली तर आपण या मांजरीची लग्न करू शकतो असे कार्ल यांनी सांगितले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही मांजर ‘जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी’ ठरणार आहे.
कार्लचे पाळीव प्राण्यांबद्दल असणारे प्रेम तर जगजाहीर आहे. त्यात ही 8 वर्षीय Choupette मांजर म्हणजे त्याची जीव की प्राण होती. या मांजरीवर कार्ल लाखो पैसे खर्च करायचा. चांदीच्या ताटात जेवणापासून ते लक्झरी गाड्यांमध्ये फिरण्यापर्यंत या मांजरीचा थाट होता. आपल्या मृत्युनंतरही आपल्या मांजरीची लाइफस्टाइल आहे तशीच राहावी म्हणून कार्ल यांनी 14, 000 कोटी रुपयांची मालमत्ता मांजरीच्या नावे केली आहे. या मांजरीला फक्त ही संपत्तीच मिळणार नाही, तर जर्मन कार फर्म आणि जपानी कॉस्मेटिक्स ब्रँडची जाहिरात केल्यानंतर तिला तब्बल 3.4 मिलियन डॉलर मानधनही मिळणारा आहे.
या मांजरीचे स्वतःचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेज आहे, ज्यावर जवळजवळ 200,000 फॉलोअर्स आहेत. या मांजरीसाठी स्वत: चा अंगरक्षक, वैयक्तिक शेफ आणि सांभाळायला दोन स्त्रिया ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आता जर्मन कायद्याने कार्लचे मृत्युपत्र मान्य केले, तर इतक्या मोठ्या संपत्तीची वारस चक्क एक मांजर ठरणार आहे.