Israel-Hamas Ceasefire In Gaza: इस्रायल-हमास गाझा युद्धबंदी (Israel-Hamas Ceasefire) करारांतर्गत आजपासून युद्धबंदी लागू झाली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी स्वतः यासंदर्भात घोषणा केली आहे. हा युद्धविराम रविवारी सकाळी 8.30 वाजता होणार होता आणि दोन्ही बाजूंच्या ओलिसांना आणि कैद्यांना सोडण्यात येणार होते. परंतु, यात अडथळा आला. तत्पूर्वी, बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी सांगितले की, हमासकडून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी मिळेपर्यंत गाझामधील युद्धबंदी लागू होणार नाही. यानंतर, आता हमासने यादी सादर केली आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8:30 वाजता युद्धबंदी लागू होण्याच्या एक तास आधी त्यांनी एका निवेदनात पुन्हा एकदा इशारा दिला.
नावे सादर करण्यास विलंब होण्यामागे हमासने तांत्रिक कारणे सांगितले आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ते गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या युद्धबंदी कराराशी वचनबद्ध आहेत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश हमाससोबतचा युद्धविराम तात्पुरता मानतो आणि गरज पडल्यास लढाई सुरू ठेवण्याचा अधिकार राखून ठेवतो. इस्रायलला ओलिसांची यादी न मिळाल्याने युद्धबंदी 3 ते 4 तासांनी पुढे ढकलण्यात आली. पहिल्या टप्प्यात सुमारे 42 इस्रायली बंधकांची सुटका केली जाईल. (हेही वाचा -Israel Hamas Ceasefire and Hostage Deal: इस्रायल, हमासमध्ये युद्धबंदी, ओलीस सूटका करार; अमेरिकेची मध्यस्थी, गाझामध्ये शांतता)
युद्धबंदीला विलंब झाल्यामुळे इस्रायलने केला हवाई हल्ले -
युद्धबंदीला विलंब झाल्यानंतर रविवारी इस्रायलने पुन्हा गाझावर हवाई हल्ले सुरू केले. यामध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. यानंतर हमासने इस्रायली बंधकांची यादी त्यांना सोपवली. परिणामी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धबंदीची घोषणा केली.