Indonesia Landslide : इंडोनेशियात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुलावेसी बेटावर गेल्या दोन दिवसांपासून मुसाळधार पाऊस सुरू आहे. काल १४ एप्रिल रोजी मोठी दुर्घटना घडली. सुलावेसी बेटावर मुसळधार पावसामुळे भूस्खलन (Indonesia Landslide) झाले. त्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय, तीन जण (Indonesia Sulawesi Island Landslide) बेपत्ता झाल्याचे समजते आहे. सुलावेसी बेटावरील ताना तोराजा परिसरात हे भूस्कलन झाल्याचे समोर आले आहे.
इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'दक्षिण सुलावेसी प्रांतातील ताना तोराजा भागात शनिवारी रात्री (१३ एप्रिल) मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तेथे भूस्कलन झाले. भूस्कलनात आजूबाजूच्या टेकड्यांवरील चार घरे अक्षरश: पत्त्यांच्या पानांसारखी कोसळली. त्यावेळी एका घरात कौटुंबिक कार्यक्रम सुरू होता. स्थानिक पोलीस अधिकारी गुनार्डी मुंडू यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर लोकांना वाचवण्यासाठी या गावांमध्ये शोध मोहिमेत सैनिक, पोलीस आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
१४ एप्रिल रोजी पहाटे आठ वर्षांच्या मुलीसह दोन जखमींना वाचवण्यात रेक्सू टिमला यश आले आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले की, बचाव कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारपर्यंत मकाले गावातून अकरा आणि दक्षिण मकाले येथून तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.
अफगाणिस्तानामध्ये मुसळधार पावसामुळे ३३ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अचानक आलेल्या पुरामध्ये शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. 'अफगाणिस्तानमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण जखमी आहेत,' असे अफगाणिस्तान सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.