अजब गजब शोधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चीन देशाने अजून एक अनोखा शोध लावून जगाला अचंबित केले आहे. चीनी शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे बायोटेक्नॉलॉजी (biotechnology) आणि जेनेटिक सायन्सच्या (genetics science) माध्यमातून हवं तसं मूल जन्माला घालणं शक्य होणार आहे. चीनी शास्त्रज्ञांनी डीएनए (DNA) मध्ये बदल करुन डिझाईनर (Designer Baby) किंवा जेनेटिकली मॉडिफाईड बाळं जन्माला घातल्याचा दावा केला आहे.
डिझाईनर बाळ तयार करणं हा उद्देश नसून रोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचा दावा चीनी शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र या प्रयोगाचा भविष्यातील धोकाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
चीनी शास्त्रज्ञांनी डीएनए मध्ये बदल केल्याने ही बाळं एचआयव्ही आणि कॉलरासारख्या रोगांपासून मुक्त असणार आहेत. शास्त्रज्ञांच्या या यशस्वी प्रयोगामुळे प्रत्येकाला हवी तशी सुंदर, हुशार, निरोगी बाळं निर्माण केली जातील. असं झालं तर भविष्यात मनासारखी बाळं निर्माण करण्याची ऑर्डरही घेतली जाईल आणि त्यानुसार पुरवठाही करण्यात येईल.
या प्रयोगामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र यावर शास्त्रज्ञ अतिशय सावध प्रतिक्रीया देत आहेत. तसंच या प्रयोगामुळे नैसर्गिक प्रक्रियेत ढवळाढवळ होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.