
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे जागतिक पातळीवर पंधरा भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमेरिकेत (US) सर्वात जास्त, 6 भारतीयांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर इटलीमध्ये 5, युएईमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर इराण आणि इजिप्तमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आता अधिकाऱ्यांनी हे मृतदेह परत घेऊन येण्याच्या प्रक्रियेस सुरूवात केली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या जास्तीत जास्त भारतीयांची संख्या इराणच्या कोम (Qom) शहरात आहे. याठिकाणी इराणमधील भारतीय मिशनने अशा रुग्णांचा वेगळे ठेवण्याचे केंद्र तयार केले आहे.
या देशांव्यतिरिक्त स्वीडनमधील एका भारतीय नागरिकाने स्वतःचा कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आत्महत्या केली आहे. जागतिक पातळीवर, प्राणघातक कोरोना व्हायरस संकटामुळे, भारत सरकारने 2500 हून अधिक नागरिकांना चीन, जपान, इराण आणि इटलीसह इतर 4 देशांमधून बाहेर काढले आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसच्या संकटाबद्दल जगभरातील भारतीय दूतांसह व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणे केले होते. जवळजवळ 75 मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी परदेशात परदेशातील भारतीयांबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी 'परदेशात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांसाठी' आणि 'परदेशात भारतीयांना मिळत असलेल्या मदतीसाठी' सर्व मिशन प्रमुखांचे कौतुक केले.
या बैठकीत बीजिंग, वॉशिंग्टन डी.सी., तेहरान, रोम, बर्लिन, काठमांडू, अबू धाबी, काबूल, माले आणि सियोल इथले मिशन प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान 24 तासांच्या कालावधीत युरोपीय देशांमध्ये 1500 जणांचा मृत्यू झाला. मात्र सध्या अमेरिका या विषाणूचे प्रभावी केंद्र सल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत मरण पावलेल्या लोकांची संख्या 7000 पेक्षा जास्त झाली आहे. तर अशा या गेल्या वर्षीच्या अखेरीस चीनमध्ये सुरू झालेल्या साथीच्या रोगाने, जगभरात 1,100,000 हून अधिक लोकांमध्ये संसर्ग झाला आहे व 60 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.