धक्कादायक! क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी आईनेच विकले पोटच्या जुळ्या मुलांना
Image used for representational purpose only (Photo Credits: Pixabay)

आई या शब्दाला आणि आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल भरण्यासाठी स्वतःची दोन जुळी मुले विकली आहेत. डेली मेलच्या अहवालानुसार चीनच्या (China) झेजियांगच्या सिक्सी येथे राहणार्‍या महिलेचे क्रेडिट कार्ड बिल 6 लाख 56 हजार रुपये होते. ते भरण्यासाठी या महिलेने चक्क आपल्या पोटाच्या दोन मुलांना विकले आहे. या मुलांचा जन्म काही दिवसांपूर्वीच झाला होता. या दोन्ही मुलांना दोन भिन्न कुटुंबात विकले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. ही मुले विकत घेणारे लोक त्या महिलेच्या घरापासून सुमारे 700 किमी अंतरावर राहत होते. शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले. चीनच्या नवीन कायद्यानुसार बाल तस्करीमध्ये सामील असलेल्या लोकांना 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. या महिलेने मुलांचा व्यवहार झाल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून नवीन फोनही विकत घेतला होता. (हेही वाचा: धक्कादायक! बीड जिल्ह्यातील महिलेचे 21 वे बाळंतपण; 38 व्या वर्षी 11 मुले व 18 नातवंडे, प्रशासनही चक्रावले)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले आहे. सध्या ही मुले या महिलेच्या पालकांकडे आहेत. या महिलेला आणि तिच्या जोडीदारासही पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने सप्टेंबरमध्ये प्रीमॅच्युअर जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतर, या महिलेचा जोडीदार किंवा त्याच्या घरातील कोणीही या महिलेला भेटायला किंवा मदत करायला आले नाही. त्यानंतर मात्र या महिलेला ही मुले एक प्रकारचे ओझे वाटायला लागले. या दरम्यान या महिलेचे क्रेडीट कार्डचे बिलही वाढले होते. एकंदर परिस्थिती लक्षात घेता तिने या मुलांना विकण्याचा निर्णय घेतला. शेवटी एका मुलाला 4.5 लाख तर दुसऱ्या मुलाला 2 लाख रुपयांमध्ये विकून टाकले.