गेल्या कित्येक वर्षांपासून सतत वापरात घट होत असल्याने, याहूने (Yahoo) 15 डिसेंबरपासून ‘याहू ग्रुप’ (Yahoo Groups) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 मध्ये याहू विकत घेतलेल्या व्हेरिजॉनने (Verizon) मंगळवारी या निर्णयाची घोषणा केली. एकेकाळी याहू ग्रुप ही वेबवरील सर्वात मोठी मेसेज बोर्ड सिस्टम (Message Board System) होती. कंपनीने एका संदेशात म्हटले आहे की, ‘याहू ग्रुप्सच्या मागील अनेक वर्षांत वापरात सतत घट दिसून येत आहे. त्याच काळात आम्ही आमच्या मालमत्तांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक पाहिली आहे, कारण ग्राहक प्रीमियम, विश्वसनीय कंटेंट शोधत आहेत.’
पुढे ते म्हणतात, ‘असले निर्णय कधीच सोपे नसतात, परंतु व्यवसायाच्या इतर बाबींवर आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे, अशा उत्पादनांबद्दल कधीकधी कठीण निर्णय घेणे आवश्यक असते जे पुढे दीर्घकालीन रणनीतीसाठी योग्य नसतात.’ याहू सेवा 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती, मात्र रेड्डीट, गूगल ग्रुप्स आणि फेसबुक ग्रुप्स यासारख्या नव्या प्लॅटफॉर्मसोबत ती स्पर्धा करू शकली नव्हती. आता 12 ऑक्टोबर रोजी नवीन ग्रुप तयार करणे बंद केले जाईल आणि 15 डिसेंबर रोजी लोक यापुढे याहू ग्रुप्सकडून ईमेल पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाहीत. याहू मेल सामान्यपणे कार्य करत राहील. (हेही वाचा: WhatsApp Chats वर नवनवे वॉलपेपर्स कसे सेट कराल?)
आपण पाठविलेले आणि प्राप्त केलेले ईमेल आपल्या ईमेलमध्येच राहतील, मात्र 15 डिसेंबरपासून आपल्या ग्रुप मेम्बर्सकडून मेसेज पाठविले किंवा प्राप्त होणार नाहीत. जर आपण 15 डिसेंबरनंतर आपल्या ग्रुपला ईमेल करण्याचा प्रयत्न केला तर आपला मेसेज डिलिव्हर होणार नाही. अमेरिकन वायरलेस कम्युनिकेशन्स सर्व्हिस प्रदाता व्हेरिजॉनने 2017 मध्ये 4.8 अब्ज डॉलर्समध्ये याहूचा इंटरनेट व्यवसाय खरेदी केला होता.