USB Charger Scam (Photo Credit : Pixabay)

USB Charger Scam: सर्वसाधारपणे असे दिसून येते की लोक कुठेही आपला मोबाईल चार्ज करतात. विमानतळ, हॉटेल आणि कॅफे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करणे हे अतिशय सामान्य आहे. मात्र, असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण सध्या बाजारात ‘यूएसबी चार्जिंग घोटाळा’ (USB Charger Scam) थैमान घालत आहे. सरकारनेही याबाबत इशारा जारी केला आहे. भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पोर्ट वापरून घोटाळे करत आहेत. याला 'ज्यूस-जॅकिंग अटॅक' असे नाव देण्यात आले आहे.

तंत्रज्ञानाने आपले जीवन खूप सोपे केले आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे आपल्याला जेवढी सुविधा मिळते, तेवढेच धोकेही आहेत. अलीकडच्या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेटशी संबंधित अनेक घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. असाच एक यूएसबी चार्जर घोटाळा सध्या चर्चेत आहे.

ज्यूस जॅकिंगमध्ये, स्कॅमर चार्जिंग पोर्टवर मालवेअर असलेले हार्डवेअर स्थापित करतात आणि जेव्हा सामान्य लोक चार्जिंगसाठी या चार्जिंग पोर्ट्सचा वापर करतात तेव्हा ते घोटाळ्याचे बळी होतात. जेव्हा लोक कुठेतरी प्रवास करतात आणि त्यांच्या फोनची बॅटरी संपते, तेव्हा लोक काहीही विचार न करता बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करतात. घोटाळेबाज लोकांच्या या गरजांचा सहज फायदा घेतात आणि फसवणूक करतात. (हेही वाचा: Apple Alerts iPhone Users: जगभरातील iPhone वापरकर्त्यांना ॲपल द्वारे इशारा, 'सावधान! मोबाईलवर सायबर हल्ला होऊ शकतो')

अशा चार्जिंग पोर्टवर चार्जिंगसाठी कोणीतरी त्यांचा फोन कनेक्ट करताच, त्यांचा सर्व डेटा स्कॅमरकडे जाऊ लागतो आणि फोन इन्स्टॉल करणाऱ्या व्यक्तीला याची माहितीही नसते. सरकारच्या सीईआरटी एजन्सीने याबाबत अलर्ट जारी केला आहे. तुमचा स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण सार्वजनिक ठिकाणी चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिकल वॉल चार्जिंग सॉकेट वापरणे चांगले. सार्वजनिक ठिकाणी डिव्हाइस चार्ज करण्यासाठी, युएसबी केबल कनेक्ट करण्यापूर्वी स्मार्टफोन नेहमी लॉक ठेवा. शक्य असल्यास फोन चार्ज करण्यापूर्वी तो बंद करा.