ISRO: उपग्रहाद्वारे अवकाशात पाठवले जाणार PM Narendra Modi यांचा फोटो, भगवद्गीता आणि 25 हजार भारतीयांची नावे; जाणून घ्या सविस्तर
Indian Space Research Organisation (Photo Credits: ISRO/Twitter)

इस्रो 28 फेब्रुवारी रोजी पीएसएलव्ही-सी 51 रॉकेटद्वारे ब्राझीलचा उपग्रह अमेझोनिया -1 (Amazonia-1) आणि आणखी तीन भारतीय उपग्रह/पेलोड प्रक्षेपित करेल. हे तिन्ही भारतीय उपग्रह भारतात स्टार्टअप्सद्वारे विकसित केले गेले आहेत. आनंद, सतीश धवन उपग्रह आणि युनिटीसॅट अशी त्यांची नावे आहेत. स्पेस किड्स इंडिया नावाच्या स्टार्टअपने सतीश धवन उपग्रह तयार केला आहे. महत्वाचे म्हणजे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि नाव देखील आहे. यासह सतीश धवन उपग्रहाद्वारे जार 25 हजार लोकांची नावे आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात नेली जाणार आहे.

स्पेस किडझ इंडियाचे सीईओ डॉ. केसन यांनी सांगितले की, 'आमच्यासारख्या स्टार्टअपला संधी दिली जात असल्याने आणि बऱ्याच लोकांची नावे मागवली होती.  आम्हाला जवळपास 25 हजार नावे मिळाली आहेत, जी या उपग्रहाद्वारे अंतराळात जातील. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव व फोटो उपग्रहाच्या वरच्या पॅनेलवर असणार आहे. भारतीय खासगी कंपनीच्या उपग्रहात लोकांची नावे पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्पेसकिडझ ही एक अशी संस्था आहे जी विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानासाठी प्रोत्साहित करते.

पीएसएलव्ही-सी 51 मध्ये तीन वैज्ञानिक पेलोडही वाहून नेण्यात येणार आहेत. यापैकी एक म्हणजे स्पेस रेडिएशनचा अभ्यास करणारे,  एक मॅग्नेटोस्फीअरचा अभ्यास करणारे आणि दुसरे लो-पॉवर वाइड-फील्ड कम्युनिकेशन नेटवर्कशी संबंधित आहे. (हेही वाचा: लवकरच ISRO लाँच करणार 2021 मधील पहिले मिशन; ब्राझील आणि भारत दोघांसाठी ठरणार एक मैलाचा दगड, जाणून घ्या सविस्तर)

डॉ. केसन पुढे म्हणाले, सतीश धवन उपग्रह (SD SAT) अवकाशातील रेडीएशनचा अभ्यास करेल. मॅग्नेटिक ड्राफ्टचा अभ्यास करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारताला' अंतराळात स्थान देईल. पंतप्रधान मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' मिशनमुळे आमच्यासारख्या कंपन्यांना अंतराळ उद्योगात इस्रोबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणूनच आम्ही त्यांचे आभार मानत त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा फोटो आणि नाव उपग्रहात ठेवून अवकाशात पाठवित आहोत. यासह ज्याप्रकारे आधी बायबल अवकाशात गेले आहे तसेच यावेळी भगवतगीता अवकाशात जाणर आहे.