Magnetic Stripe Debit Cards (PC- SBI Twitter)

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता एसबीआयने मॅग्नेटिक स्ट्राईपचे (Magnetic Stripe) एटीएम कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन एटीएम कार्ड (ATM Card) घ्यावे लागणार आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी नव्या एटीएम कार्डमध्ये सेफ ईएमव्ही चीप (EMV Chip) बसवली आहे. ग्राहकांना हे जुने कार्ड बदलून घेण्यासाठी बँकेने 31 डिसेंबर 2019 पर्यंतची मुदत दिली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार, एसबीआयने आपले सर्व 'मॅग्नेटिक स्ट्राईप'चे कार्ड 'ईएमव्ही चीप' आणि पिन बेस कार्डमध्ये बदलून घेतले आहेत. ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट कार्डला सेफ ईएमव्ही चीप कार्ड आणि पिन बेस SBI कार्ड घेण्यासाठी आपल्या जवळच्या SBI शाखेत अर्ज करावा लागणार आहे. एसबीआयने यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. (हेही वाचा - Fact Check: 2000 हजारांच्या नोटा बंद होणार? 1 हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? जाणून घ्या काय आहे सत्य)

जुन्या कार्डमुळे एटीएम आणि स्वाईप मशीनच्या माध्यमातून कार्ड क्लोनिंगच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आरबीआयने मॅग्नेटिक कार्ड ईएमव्ही चीपमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना सुरक्षितपणे पैशाची देवाणघेवाण करता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना हे मॅग्नेटिक कार्ड बदलून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत. ही सुविधा अगदी मोफत आहे. हे कार्ड ग्राहकांना ऑनलाईन किंवा आपल्या जवळच्या शाखेतही बदलून मिळणार आहे. कार्ड बदलून घेण्यासाठी कोणीही पैसे मागीतल्यास बँकेत संपर्क करा, असंही SBI ने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग असेल तर तुम्ही त्याच्या माध्यमातूनही सेफ ईएमव्ही चीपसाठी अर्ज करू शकता. परंतु, यासाठी तुमच्या घरचा पत्ता अपडेट असणे गरजेचे आहे. कारण, बँक तुमच्या नोंदणिकृत पत्त्यावर कार्ड पाठवेल. त्यामुळे तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे.