Samsung ने लॉन्च केला उभी स्क्रीन असणारा टीव्ही; 90 अंशात फिरणार, फोनप्रमाणे करू शकता वापर
उभी स्क्रीन असणारा टीव्ही (संग्रहित-संपादित प्रतिमा)

तंत्रज्ञान क्षेत्रात घडलेल्या क्रांतीमुळे, विविध क्षेत्रात अनेक नवनवीन अविष्कार पाहायला मिळाले. यामुळे लोकांचे आयुष्य अतिशय सुखकर आणि आरामदायक झाले.. चीनची कंपनी शाओमी चक्क दोन स्क्रीन असणारा टीव्ही (Double-Sided TV) बाजारात घेऊन यायची तयारी करत असताना, सॅमसंग (Samsung) कंपनीने उभी स्क्रीन (vertical) असणारा टीव्ही लॉन्च केला आहे. या हटके स्क्रीन फीचरमुळे हा टीव्ही अगदी एका स्मार्टफोन प्रमाणे भासत आहे. द सेरो (The Sero) असे या टीव्हीचे नाव असून, याची स्क्रीन 43 इंच इतकी आहे.

मोबाईल प्रेमींना डोळ्यासमोर ठेऊन या टीव्हीची निर्मिती करण्यात आली आहे. या टीव्हीची स्क्रीन 90 अंशामध्ये फिरत असल्याने तुम्ही एखाद्या फोनप्रमाणे या टीव्हीचा वापर करू शकता. या टीव्हीची स्क्रीन फिरवून उभी केल्यावर तुम्ही तुमच्या फोनशी हा टीव्ही कनेक्ट करू शकता. फोनप्रमाणे सोशल मिडीया, यूट्यूब, शॉपिंग अशा सर्व गोष्टी तुम्ही या टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता.

या टीव्हीमध्ये तुम्ही फोटोदेखील क्लिक करू शकणार आहात. या टीव्हीची टच स्क्रीन असल्याने प्रेझेन्टेशन बनवणे किंवा इतर व्यावसायिक कामासाठीही तुम्ही हा टीव्ही वापरू शकता. जेव्हा हवा तेव्हा या टीव्हीची स्क्रीन आडवी करून नेहमीप्रमाणे या टीव्हीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. (हेही वाचा: Xiaomi घेऊन येत आहे दोन्ही बाजूंनी पाहता येणारा टीव्ही)

या टीव्हीमध्ये 4.1 चॅनल, 60 वॉटसह हाय-एंड स्पीकर आहेत, याद्वारे तुम्ही सॅमसंग म्युझीक ऐकू शकतात. या टीव्हीला सॅमसंगच्या व्हर्चुअल असिस्टंट Bixby द्वारे कंट्रोल करता येते. सध्या या टीव्हीची किंमत जवळपास 11.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली असून, पुढील महिन्यापासून दक्षिण कोरियामध्ये हा टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र जितका फोन हाताळणे सोपे आहे तितका टीव्ही च्या माध्यमातून हा फोन हाताळणे अवघड ठरणार आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे.