Reliance Jio Low-Cost Phone: रिलायन्स जिओ या वर्षांच्या अखेरीस स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात घेऊन येण्याची शक्यता; Xiaomi, Realme, Oppo, Vivo सारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

एक टेलिकॉम कंपनी म्हणून मोठ्या कंपन्यांना मागे सोडल्यानंतर, आता रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) म्हणजेच जिओने (Jio) स्मार्टफोन तयार करणार्‍या कंपन्यांना आव्हान देण्याची योजना आखली आहे. होय, ताज्या अहवालानुसार रिलायन्स जिओ या वर्षाच्या अखेरीस 100 दशलक्ष स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन  (Android Phone) बाजारात आणू शकेल. अहवालात सूत्रांनी सांगितले की, कंपनी हे स्मार्टफोन डेटा पॅकसोबत बाजारात आणणार आहे, जे डिसेंबर 2020 मध्ये किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला सादर केले जातील. बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी यांनी जुलैमध्ये सांगितले होते की, गूगल कमी किंमतीच्या 4 जी किंवा 5 जी स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम (OS) तयार करेल, जे रिलायन्स डिझाइन करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज टेलिकॉम युनिट हे गूगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणाऱ्या कमी किंमतीच्या 10 कोटी स्मार्टफोनच्या निर्मितीचे आउटसोर्स करणार आहे.

आता निश्चितच जेव्हा जिओचे नवीन स्वस्त अँड्रॉइड 4 जी आणि 5 जी स्मार्टफोन बाजारात येतील, तेव्हा झिओमी, रियलमी, ओप्पो आणि व्हिवो सारख्या चीनी स्मार्टफोन निर्माता ब्रँडसमोर एक आव्हान उभे राहील. भारतीय बाजारामध्ये अशाच चीनी स्मार्टफोनचा दबदबा आहे. सध्या भारतात विकल्या गेलेल्या दर 10 पैकी 8 स्मार्टफोन चिनी कंपन्यांनी बनवले आहेत. किफायतशीर किंमत, उत्तम कॅमेरा आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांच्या आधारे चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन खूपच पसंत केले जातात. (हेही वाचा: Jio Fiber Free Trial Plan: जिओ फायबर अनलिमिटेड फ्री ट्रायल प्लान घोषीत; वैधता, दर आणि स्पीड घ्या जाणून)

दरम्यान, रिलायन्सने 2017 साली अशीच योजना सादर करताना जिओ फोन लॉन्च केले होते, हे डिव्हाइस वापरकर्त्यांना फिचर फोनमधील इंटरनेट सेवा प्रदान करते. जिओ फोनचे सध्या 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत, त्यातील बहुतेक लोक या फोनवर प्रथमच इंटरनेट सेवा वापरत आहेत. कमी किंमत व माफक इंटरनेट दर यांमुळे या फोनला चांगलीच पसंती मिळाली.