रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कारवाईनंतर पेटीएम कंपनी पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) लिमिटेडच्या दोन संचालकांनी राजीनामा दिला आहे. शिंजिनी कुमार आणि मंजू अग्रवाल हे कंपनीच्या संचालकपदावरून पायउतार झाले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळावर आता तीन संचालक शिल्लक आहेत. संचालकांच्या राजीनाम्याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही (हेही वाचा - Paytm Payments Bank: आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएमची बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद)
आरबीआयने मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. फक्त पैसे ट्रान्सफर आणि पैसे काढण्याची परवानगी असेल. 29 फेब्रुवारीपासून ग्राहक पेटीएम वॉलेट किंवा फास्टॅग टॉप अप वापरू शकणार नाही. तसेच खात्यात पैसे जमा करू शकणार नाहीत. कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे.
आरबीआयच्या कारवाईनंतर डिजिटल पेमेंटबाबत लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र डिजिटल पेमेंटसाठी व्यापारी आणि ग्राहक यांच्यात निर्माण झालेला विश्वास कायम राहील. पेटीएम विरोधात घेतलेल्या निर्णयाचा डिजिटल पेमेंट प्रणालीवर कोणताही परिणाम होणार नाही. असा दावा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केला आहे.