मेड इन इंडिया Hike Sticker Chat App 14 जानेवारीपासून होणार बंद; ताबडतोब सेव्ह करा तुमचा डेटा
Hike (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतात Hike Sticker Chat App च्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हायकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केविन भारती मित्तल यांनी ट्विट केले आहे की 14 जानेवारी रोजी भारतात हायक चॅट अ‍ॅप बंद होईल. या देसी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपचे भारतात 10 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत आणि या लोकप्रिय चॅट अ‍ॅपवर वापरकर्ता दररोज अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ व्यतीत करत आहेत. आता हे अ‍ॅप बंद होत आहे यावरून दिसत आहे की, भलेही सोशल मीडियावर भारतीय वापरकर्ते ‘मेड इन इंडिया’ सोशल मीडियाची मागणी करतो असोत पण प्रत्यक्षात त्यांना ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅप वापरायचे नाही.

मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, Hike Sticker Chat अॅप जानेवारी 2021 मध्ये बंद केले जाईल, मात्र HikeMoji आणि हायकच्या इतर सेवा सुरू राहतील. वापरकर्ते सहजपणे त्यांचा डेटा आणि बॅकअप मेलमध्ये किंवा अन्यत्र सेव्ह करू शकतात. हायकचे दोन अॅप Vibe आणि Rush कार्यरत राहतील आणि लोक या अॅप्सचा वापर करण्यास सक्षम असतील.

हायक कंपनीने Hike Sticker Chat अ‍ॅप एप्रिल 2019 मध्ये लाँच केले होते. या हायक स्टिकर चॅट अ‍ॅपवर 40 भारतीय भाषांमध्ये 30,000 हून अधिक स्टिकर्स होते. डिसेंबर 2019 मध्ये, या अ‍ॅपच्या साप्ताहिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली होती. हाइक अ‍ॅपलाच Hike Sticker Chat अ‍ॅप म्हणून ओळखले जाते. केविन मित्तल म्हणाले की, 14 जानेवारी रोजी रात्री 11:59 वाजता Hike Sticker Chat App पूर्णपणे बंद होईल. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना डेटा एक्सपोर्ट करण्यासाठी अधिसूचना पाठवल्या आहेत.