उद्या Reliance कडून होणार धमाकेदार घोषणा?; Jio GigaFiber, JioPhone 3 आणि Jio GigaTV लॉंच होण्याची शक्यता
Jio (Photo Credits: IANS)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रिलायन्स (Reliance) आपली वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेणार आहे. ही एजीएम 12 ऑगस्ट रोजी आयोजित केली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या बैठकीत काहीतरी धमाकेदार समोर येईल, अशी अपेक्षा आहे. रिलायन्सच्या या 42 व्या एजीएममधील सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे जिओ गीगा फायबरचे (Jio GigaFiber) रोल आउट होणे हे आहे. या व्यतिरिक्त, कंपनी या एजीएममध्ये जिओ गिगा टीव्ही (Jio GigaTV) तसेच त्यांच्या जिओफोन (JioPhone) ची अपग्रेड केलेली आवृत्ती जिओफोन 3 सादर करू शकते.

रिलायन्स जिओने गेल्या वर्षी झालेल्या एजीएममध्ये जिओ गीगा फाइबर लॉन्च करण्याची घोषणा केली होती. तथापि, या उत्पादनाच्या व्यावसायिक रोलआऊटची अद्याप प्रतीक्षा आहे. जिओ आता हळूहळू गीगा फायबर मोठ्या शहरांमध्ये चाचणीसाठी उपलब्ध करुन देत आहे. जर तुम्हालाही त्याची चाचणी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 4500 रुपये द्यावे लागतील, जे परत केले जातील. याशिवाय रिलायन्सच्या जिओफोन 3 देखील लोकांना प्रतीक्षा आहे. यापूर्वीही याबाबत बर्‍याच बातम्या आल्या आहेत. तथापि, कंपनीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

जिओ गीगा फायबर - गीगा फायबर ही रिलायन्सची बहुप्रतीक्षित ब्रॉडबँड सेवा आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी या सेवेची चाचणी घेत आहे. या सेवेद्वारे कमी दरात उत्तम इंटरनेट उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे (हेही वाचा: MediaTek Chipset असलेला जिओचा नवा फोन लवकरच होणार लॉन्च)

 जियोफोन 3 – हा फोन जिओच्या सध्याच्या फोनचे उपग्रेटेड व्हर्जन असणार आहे. हा 4G फीचर फोन असण्याची शक्यता असून उद्या हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

जिओ गिगा टीव्ही - गिगा फायबर सेवेद्वारेच टीव्ही चॅनलची सेवा पुरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उद्याच्या वार्षिक मिटिंगमध्ये जिओ गिगा टीव्ही सादर होण्याची शक्यता आहे.