Apple (Image: PTI)

अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी अॅपल (Apple) लवकरच भारतामध्ये त्यांचे उत्पादन सुरु करणार आहे. अॅपल आणि तिच्या तीन उपकंपन्यांनी यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA) कडे मोबाईल उपकरणे तयार करण्यासाठी अर्ज केला आहे. प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की कंपन्यांनी सुमारे 23 एकर जमिनीवर 2800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

कंपनीची आयफोन-16 भारतातच बनवण्याची योजना आहे. कंपनीचे हे युनिट इथे स्थापन झाल्यावर 10,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळेल. अशाप्रकारे अॅपलच्या भारतामधील  आगमनाने इतर कंपन्यांचाही कल भारताकडे वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्राधिकरणाचे अधिकारी गुंतवणूक वाढवण्यासाठी गेल्या आठवड्यात जपान आणि कोरियाला गेले होते, तिथे त्यांनी अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.

बैठकीमध्ये अॅपल आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी भारतात 2800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. अॅपल आणि संलग्न कंपन्यांना सेक्टर 29 मध्ये जमीन देण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण वीर सिंग यांनी सांगितले. हे क्षेत्र आधीच विकसित झाले आहे आणि अनेक सुविधा येथे जवळजवळ तयार आहेत. त्यामुळे कंपन्या बांधकामानंतर उत्पादन सुरू करू शकतील. करारानंतर या कंपन्यांनी यमुना प्राधिकरणाकडे 10 टक्के रक्कम जमा केली आहे. (हेही वाचा: आता Xiaomi मोबाईल कंपनीतील कर्मचारी होणार बेरोजगार! चायजिज मोबाईल कंपनी Xiaomi चा नोकरकपातीचा निर्णय)

शाई बनवणारी अॅपलची सहयोगी कंपनी Seiko Advance Limited ने येडा येथील सेक्टर 29 मध्ये 5 एकर जागेवर आपले उत्पादन बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही कंपनी 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हजारो लोकांना रोजगार देणार आहे.