Intel Data Hack: इंटेल कंपनीचा 20 जीबी गोपनीय डेटा अज्ञात हॅकरकडून लीक; सोशल मिडियावर केला शेअर
Intel (Photo Credits: IANS)

काही दिवसांपूर्वीच अनेक दिग्गजांचे ट्विटर हॅक (Twitter Hack) झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी 17 वर्षांच्या सूत्रधार असलेल्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आता अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलचा (Intel) सुमारे 20 जीबी गोपनीय आणि पर्सनल डेटा हॅकरने हॅक करून सोशल मीडियावर लीक (Leak) केला आहे. ऑनलाइन मीडियानुसार, अज्ञात हॅकरने टेलिग्राम (Telegram) अ‍ॅपवर 20 जीबी फाईलची एक लिंक शेअर केली आहे. यामध्ये या वर्षाच्या सुरुवातीस चोरी झालेल्या इंटेलच्या फायली देखील आहेत. याशिवाय हॅकरने ही फाईल ट्विटरवरही शेअर केली आहे.

यासह हॅकरने एक पोस्ट देखील लिहिली होती ज्यात तो म्हणतो,  'फोल्डरमधील बर्‍याच फायली यापूर्वी कुठेही प्रकाशित केल्या गेल्या नाहीत, कारण त्या NDA किंवा इंटेल रिस्ट्रिक्टेड सीक्रेट अंतर्गत गोपनीय फाइल्स आहेत.' एवढेच नाही तर या व्यक्तीने या झिप फोल्डर उघडण्यासाठी पासवर्डदेखील सांगितला आहे. यावर कंपनीचा असा विश्वास आहे की, बाहेर पडलेली माहिती इंटेल रिसोर्स अँड डिझाईन सेंटरकडून आली असेल जी ग्राहक, भागीदार आणि इतर पक्षांकडून वापरण्यासाठी माहिती घेते आणि तिथूनच त्याला एक्सेस केले जाऊ शकते. अहवालात असे म्हटले आहे की, इंटेलचे असे मत आहे की ज्या व्यक्तीला या डेटाचा एक्सेस आहे अशा एखाद्याने हा डेटा डाउनलोड केला आणि तो ऑनलाइन लिक केला.

हॅकरने दावा केलेला सर्व डेटा या लीक झालेल्या फोल्डरमध्ये असेल तर, इंटेल फार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. हॅकरने ज्यूसर आणि अधिक वर्गीकृत माहिती लीक करण्याचेही धमकी दिली आहे. सन 2020 मध्ये, इंटेलला उत्पादनात विलंब, घसरणारे स्टॉक आणि बर्‍याच महत्त्वाच्या कर्मचार्‍यांचे बाहेर पडणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यानंतर अशा लीकमुळे पुन्हा एकदा कंपनीसाठी नवी समस्या उभी ठाकली आहे.