स्मार्टफोन (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की, चीन (China) आणि इतर देशांनी विकसित केलेल्या 348 मोबाईल अॅप्सची ओळख पटवून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे अॅप्स वापरकर्त्यांची माहिती गोळा करून ती देशाबाहेरील सर्व्हरवर अनधिकृतपणे पाठवत होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत रोडमल नगरच्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशाबाहेर माहिती पाठवणारे कोणते अॅप सरकारने ओळखले आहे का? आणि असे कोणतेही अॅप आढळल्यास त्यावर बंदी घालण्यात आली आहे का? असा प्रश्न सदस्याने विचारला होता.

उत्तरात, मंत्री म्हणाले की केंद्रीय गृह मंत्रालयाने अशा 348 अॅप्सची ओळख पटवली आहे आणि मंत्रालयाच्या विनंतीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे सर्व अनुप्रयोग अवरोधित केले आहेत, कारण असे डेटा ट्रान्समिशन भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे, भारताचे संरक्षण आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन करते. चंद्रशेखर म्हणाले की, हे अॅप्स चीनसह विविध देशांनी विकसित केले आहेत.

भारतात PUBG ला बंदी घातल्यानंतर, त्याची नवीन आवृत्ती Battleground Mobile India (BGMI) देखील भारतात प्लेस्टोअर आणि ऍपल अॅप स्टोअरवरून काढून टाकण्यात आली आहे. गुरुवारी (28 जुलै), बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल अॅप स्टोअरवरून गायब झाला. या  संदर्भात सरकारकडून आदेश प्राप्त झाला असून त्यामुळे अॅपचा अॅक्सेस ब्लॉक करण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे. (हेही वाचा: 5G Service: भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा)

भारतात PUBG मोबाईलवर बंदी घातल्यानंतर BGMI गेल्या वर्षीच देशात लाँच करण्यात आला होता. दरम्यान, याआधी सुरक्षेच्या कारणास्तव माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत 14 फेब्रुवारी रोजी बॅटल रॉयल गेम फ्री फायरसह 53 अन्य चीनशी संबंधित अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.