स्मार्टफोन खरेदीत भारत अव्वल ; अमेरिकेलाही टाकले मागे
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन खरेदीत भारताने बाजी मारली आहे. अमेरिकेला मागे टाकत भारताने स्मार्टफोन खरेदीत दुसरे स्थान मिळवले आहे. जुलै ते सप्टेंबर 2018 या तीन महिन्यांचा अहवाल कॅनालिस या संस्थेने सादर केला आहे. हा अहवाल पाहता स्मार्टफोन खरेदीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले असल्याचे दिसून येते. या तीन महिन्यांच्या कालावधी भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या 4.04 कोटी इतकी होती. तर स्मार्टफोन खरेदीत स्मार्टफोन चीनने पहिल्या स्थानावर आहे. चीनमध्ये एकूण 10.06 कोटींचे स्मार्टफोन्स दाखल झाले आहेत. तर अमेरिकेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या 4 कोटी इतकी आहे.

ही आकडेवारी पाहता स्मार्टफोन्स विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जागतिक बाजारपेठेत मंदी असल्याने बाजारात स्मार्टफोन्सची एकूण विक्री कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री 7.2% घटून 34.89 कोटी इतकी झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्मार्टफोनची विक्रीत सातत्याने घट झाली असल्याचे कॅनालिसच्या अहवालात म्हटलं आहे.

असे जरी असले तरी तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झालेली दिसून येते. इंडोनेशिया (13.2 टक्के वाढीसह 89 लाख), रशिया (11.5 टक्के वाढीसह 88 लाख) व जर्मनी (2.4 टक्के वाढीसह 55 लाख) या देशात स्मार्टफोनच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येते.

प्रथम स्थानी असलेल्या चीनी बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत 15.2% घट झाली आहे. तर भारतीय बाजारपेठेत 1.1% घट झाली आहे. स्मार्टफोन उत्पादकांमध्ये सॅमसंग आघाडीवर आहे. त्यानंतर हुआवेई, अॅपल, शाओमी, ओप्पो या कंपन्या आहेत.