Google (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) केवळ चीन आणि इटलीच नाही, तर जगातील सुमारे 70 देश चिंतेत आहेत. हा साथीचा आजार जवळजवळ सर्व देशांत पसरला आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेत आहे. कोरोना व्हायरसपासून भारतही वाचू शकला नाही. नुकतेच या संसर्गाच्या प्रादुर्भावाची पुष्टी देशात मिळाली आहे. कोरोना व्हायरसमुळे तंत्रज्ञान उद्योगातही खळबळ उडाली आहे.

यामुळे आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. आता या व्हायरसमुळे गुगलचा (Google) वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम, Google I / O 2020 रद्द केल्याची बातमी मिळत आहे.

गूगलने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर गूगल आय/ओ 2020 इव्हेंट रद्द करण्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाव्हायरसमुळे हा इव्हेंट रद्द केला जात असल्याचे सांगितले आहे. हजारो लोक यात सहभागी होऊ शकतात, त्यामुळे खबरदारी म्हणून हा कार्यक्रम रद्द केला गेला आहे. आपले आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचे गुगलने सांगितले आहे. तसेच ज्यांनी या कार्यक्रमासाठी तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना, 13 मे पर्यंत तिकिटांचे पैसे परत देण्यात येणार असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.

हा कार्यक्रम 12 ते 14 मे दरम्यान होणार होता. मात्र अद्याप त्याच्या नवीन तारखेविषयी माहिती देण्यात आलेली नाही. गुगल दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करते आणि यावेळी कंपनी नवीन अँड्रॉइड व्हर्जनविषयी माहिती देते. याशिवाय गुगलचे हार्डवेअरदेखील या कार्यक्रमात सादर केले जातात. या व्यतिरिक्त गुगलने सॅन फ्रान्सिस्कोमधील क्लाऊड नेक्स्ट इव्हेंटही रद्द केला आहे.

(हेही वाचा: Apple कंपनीकडून होम सर्व्हिसची घोषणा; आता गॅजेट्स दुरुस्ती करायला घरी येणार इंजिनिअर)

यापूर्वी, कोरोना विषाणूमुळे जगातील सर्वात मोठा मोबाइल शो मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस म्हणजेच MWC 2020 देखील रद्द करण्यात आला आहे. भारतात शाओमी आणि रियलमीनेही त्यांचा मोठा कार्यक्रम कोराना विषाणूच्या भीतीने रद्द केला आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन केला जाईल, म्हणजेच, आपण त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल. मायक्रोसॉफ्ट, गुगलसह अनेक कंपन्यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले आहेत.