सर्च इंजिन गुगलमध्ये (Google) काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र फार कमी लोकांना ती संधी मिळते. गुगलमधील चांगला पगार हे कंपनी जॉईन करण्याचे एक महत्वाचे कारण आहे. आता कंपनी देऊ करत असलेल्या पगाराबाबत एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. अहवालानुसार, एकदा गुगलने आपल्या एका कर्मचाऱ्याला पेरप्लेक्सिटी एआयमधील (Perplexity AI) नोकरी बदलण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्या पगारात तब्बल 300 टक्के वाढ देऊ केली होती.
हा कर्मचारी गुगल सोडून दुसऱ्या कंपनीत जॉईन होणार होता व ही गोष्ट टाळण्यासाठी गुगलने कर्मचाऱ्याच्या पगारात 300 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. गुगलचा हा कर्मचारी आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्याची स्टार्टअप कंपनी, पर्पलेक्सिटी एआय सोडून जाण्याचा विचार करत होता.
पर्पलेक्सिटी एआयचे सीइओ अरविंद श्रीनिवास यांनी बिग टेक्नॉलॉजी पॉडकास्टवर याचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी किती पुढे जाण्यास तयार आहे हे सांगितले. श्रीनिवास म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्याला प्रचंड पगारवाढ मिळाली, तो 'सर्च टीम'चा भाग होता आणि त्याचा एआय विभागाशी थेट संबंध नव्हता. गुगलमध्ये अलीकडील नोकर कपातीच्या बातम्यांदरम्यान ही इतक्या मोठ्या पगारवाढीची बाब समोर आली आहे. (हेही वाचा: AI Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे निर्माण होतील मोठ्या प्रमाणात नोकऱ्या; 46 टक्के कंपन्या देत आहेत एआयचे ट्रेनिंग)
दरम्यान, 10 जानेवारीपासून, गुगलने विविध विभागांमधील एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. पिचाई यांनी केलेल्या पूर्वीच्या घोषणेनुसार, कंपनीने जागतिक स्तरावर अंदाजे 12,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना दर्शविली होती, जी गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 6 टक्के आहे. अनेक टेक कंपन्यांनी 2024 च्या पहिल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात टाळेबंदी केली आहे. या अंतर्गत सुमारे 32,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. गेल्या महिन्यात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना आणखी नोकऱ्या कपातीसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता.