खुशखबर! आता Flipkart वर पाहू शकणार मोफत चित्रपट आणि वेबसिरीज; Amazon Prime समोर तगडे आव्हान
Flipkart (Photo Credits: File Photo)

वॉलमार्ट (Walmart) या लोकप्रिय कंपनीच्या अधिपत्याखाली असलेली ई-व्यवसायिक कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart), ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी व्हिडिओ सर्व्हर (Flipkart Video) चालू करत आहे. सोमवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, 'फ्लिपकार्ट व्हिडिओ'मध्ये शॉर्ट फिल्म, फिचर फिल्म आणि सिरीज या भारतीय भाषांमध्ये असतील. कंपनी आपली व्हिडिओ लायब्ररी विस्तृत करण्यासाठी विविध करमणूक कंटेंट निर्मात्यांशी चर्चा करीत आहे. ही सेवा ज्या ग्राहकांकडे अॅप आहे त्यांनाच मिळणार आहे. या सेवेचा आनंद ग्राहकांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर घेता येणार नाही.

सध्या ई-व्यवसायिक कंपनी अॅमेझॉन आपली प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) सेवा ग्राहकांना पुरवत आहे. त्याची आता फ्लिपकार्ट व्हिडिओशी टक्कर होणार आहे. फरक इतकाच असणार आहे की, सध्या तरी फ्लिपकार्टची ही सेवा मोफत असल्याचे समजत आहे, परंतु यावर जाहिराती असणार आहेत. मात्र  प्राईम व्हिडिओसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात. नवीन 200 दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा कंपनी प्रयत्न करीत आहे. मात्र बाजारात टिकण्यासाठी या क्षेत्रात आधीच दबदबा असलेल्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार, जी 5, सोनी लिव्ह, अल्ट बालाजी, टीव्हीएफ प्ले आणि एमएक्स प्लेयर सारख्या इतर अनेक प्लॅटफॉर्मशी कंपनीला स्पर्धा कावरी लागेल. (हेही वाचा: Flipkart National Shopping Days: फ्लिपकार्ट सेल मध्ये ASUS कंपनीच्या दमदार स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांपर्यंत सूट)

फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी पीटीआयला माहिती देताना सांगितले की, ‘आम्ही या सेवेमध्ये बरीच गुंतवणूक करीत आहोत. खरेदीबरोबरच, वापरकर्त्यांनी व्यासपीठावर (अ‍ॅपवर) अधिक वेळ घालवावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही मनोरंजन सामग्रीचा वापर करत आहोत.’ सध्या या सेवेची चाचणी काही ठराविक ग्राहकांसोबत चालू आहे. साधारण 20 दिवसांमध्ये ही सेवा सर्व ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते.