disney-hotstar

नेटफ्लिक्सने त्यांच्या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातल्यानंतर आता डिजनी प्लसनेदेखील पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे वापरकर्त्यांना कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कुणालाही पासवर्ड शेअर करता येणार नाही, असे घोषित केले होते. येत्या काही महिन्यांतच या पासवर्ड क्रॅकडाउनची प्रक्रिया सुरू होणार आहे असे समजते. हे करण्यामागे कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ करणे हा उद्देश सांगितला जात आहे. (हेही वाचा - भारतात Netflix ला झटका! स्थानिक कार्यक्रमा अभावी व्यवसाय प्रभावित)

“डिजनी प्लसला जर चुकीच्या अकाउंट शेअरिंगचा संशय आला किंवा व्यक्तीने दुसऱ्याच्या अकाउंटवर साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला स्वतःचे सबस्क्रीप्शन अकाउंट उघडण्याचा पर्याय समोर येईल. हा नियम मार्च 2024 पासून लागू होईल”, असे डिजनी प्लसचे मुख्य वित्त अधिकारी ह्यू जॉन्स्टन यांनी सांगितले.

एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त, दुसऱ्या घरात राहणाऱ्या व्यक्तीबरोबर पासवर्ड शेअरिंगवर बंदी करण्याचा नियम डिजनी प्लसने खरंतर या वर्षापासूनच लागू केला आहे. पासवर्ड शेअरिंगमुळे नेटफ्लिक्स, डिजनी प्लस यांसारख्या कंपन्यांना चांगलाच फटका बसत होता. कारण अनेक व्यक्तींसह पासवर्ड शेअर करणे म्हणजे, सबस्कायबर्सची संख्या कमी; परिणामी कंपनीला पैसे मिळण्याचे प्रमाणदेखील कमी, असे साधे गणित आहे. पासवर्ड शेअरिंग बंद केल्यापासून नेटफ्लिक्सचे तब्ब्ल नऊ मिलियन इतके सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.