Brand Finance Global 500: Reliance Jio चे मोठे यश; Apple, Amazon ला मागे टाकून बनला जगातील 5 वा ताकदवान ब्रँड
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

गेल्या काही वर्षांमध्ये देशात रिलायन्स जिओचा (Reliance Jio) दबदबा चांगलाच वाढला आहे. जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतर व्होडाफोन, आयडिया, एअरटेल अशा अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. आता जिओने अजून एक पराक्रम केला आहे. 2021 च्या ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 (Brand Finance Global 500) च्या यादीमध्ये प्रथमच समाविष्ट झालेल्या रिलायन्स जिओने सर्व कंपन्यांना पराभूत करून 5 वा क्रमांक मिळविला आहे. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 च्या यादीमध्ये जगातील सर्वात ताकदवान ब्रॅण्ड्सची रँकिंग केली जाते. रिलायन्स जिओने Apple, Amazon, अलिबाबा आणि पेप्सी यांसारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे.

जगातील सर्वात पहिल्या 10 ब्रँडमध्ये समाविष्ट झालेली रिलायन्स जिओ ही भारतामधील एकमेव कंपनी आहे. ब्रँड सामर्थ्याच्या बाबतीत, रिलायन्स जिओने 100 पैकी 91.7 ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (BSI) गुण आणि एएए + रँकिंग प्राप्त केली आहे. 2016 मध्ये स्थापित होऊनही जिओ वेगाने भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर बनली आहे आणि जगातील तिसरे सर्वात मोठे मोबाइल नेटवर्क आहे. या कंपनीचे जवळपास 400 दशलक्ष ग्राहक आहेत.

या यादीमध्ये चिनी मोबाईल अॅप WeChat ला प्रथम स्थान देण्यात आले आहे. यानंतर, दुसर्‍या क्रमांकामध्ये ऑटो जायंट फेरारीचा समावेश आहे, ज्याला 93.9 BSI स्कोअर प्राप्त झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रशियन ब्रँडSber आहे ज्याचा BSI स्कोअर 92 आहे. चौथ्या क्रमांकावर कोका कोला असून त्याचा BSI स्‍कोअर 91.7 आहे. पाचव्या क्रमांकावर जिओ, सहाव्या क्रमांकावर Deloitte, सातव्या नंबरवर LEGO, Amazon आठव्या क्रमांकावर आहे. डिस्ने नवव्या क्रमांकावर तर EY दहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन ऑनलाइन पेमेंट कंपनी पेपल या यादीत 12 व्या स्थानावर आहे. चिनी कंपनी अलिबाबा 18 व्या क्रमांकावर आहे. Apple 19 आणि पेप्सी 20 व्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: Reliance Jio च्या 'या' प्लॅनवर दिला जातोय 168GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल)

अहवालात म्हटले आहे की, जिओने भारतीय बाजारातील कोट्यावधी ग्राहकांना परवडणारे 4 जी नेटवर्क दिले आहे. जिओने भारतीयांची डेटा वापरण्याची सवय पूर्णपणे बदलली. भारतीय ग्राहकांच्या डेटा वापराच्या क्रांतिकारक बदलाला ‘जिओ इफेक्ट’ म्हटले गेले आहे.