BlueSky App: मार्केटमध्ये आला ट्विटरला नवीन पर्याय; Jack Dorsey यांनी सादर केले ब्लूस्काय अॅप, जाणून घ्या सविस्तर
BlueSky App (संग्रहित संपादित प्रतिमा)

ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी ट्विटरचा एक नवीन पर्याय सादर केला आहे. जॅक डोर्सी यांनी अँड्रॉइडवर ‘ब्लूस्काय’ (BlueSky) अॅप लाँच केले आहे. ही ट्विटर सारखी मायक्रो ब्लॉगिंग साइट आहे. जेव्हा ट्विटरने लोकांच्या खात्यांवरून ब्लू टिक्स काढून टाकले आहेत, तेव्हाच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ब्लूस्काय सादर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लूस्काय अॅप अजूनही टेस्टिंग मोडमध्ये आहे. ब्लूस्काय इनव्हाईट कोड आणि ओटीपीद्वारेच उघडता येते. या अॅपबाबत वेगाने काम सुरू आहे. अॅपची रचना सुरुवातीच्या ट्विटर सारखी दिसते. ब्लूस्कायमध्ये, वापरकर्ते 256 शब्दांच्या पोस्ट शेअर करू शकतात. पोस्टसोबत फोटो जोडण्याचाही पर्याय आहे. वापरकर्ते त्यांचे खाते शेअर, म्यूट किंवा ब्लॉक करू शकतात.

रिपोर्ट्सनुसार, ट्विटर प्रमाणेच यात बुकमार्क, मॉनिटरिंग लाईक्स, पोस्ट मॉडिफाय, कोट पोस्ट, डायरेक्ट मेसेज, हॅशटॅग सारखे फीचर्स उपलब्ध असतील. ट्विटर पोस्ट करण्यापूर्वी ‘What’s happening’ असे विचारते. त्याचप्रमाणे ब्लूस्काय आपल्या वापरकर्त्यांना 'What's up' विचारते. सध्या ब्लूस्कायचे 20 हजार सक्रिय वापरकर्ते असल्याचे सांगितले जात आहे, तर Google Play Store वरून 10 हजारांहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केले आहे. हे प्रथम फेब्रुवारी 2023 मध्ये iOS वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले होते.

हे अॅप केवळ काही वापरकर्त्यांसाठी चाचणी करण्याच्या उद्देशाने लॉन्च केले गेले. साधारण 2019 पासून ब्लूस्कायवर काम सुरू आहे. असा दावा केला जात आहे की, ब्लूस्काय आपल्या वापरकर्त्यांना सध्याच्या मायक्रो ब्लॉगिंग साइट्सपेक्षा अधिक फीचर्स आणि सुविधा देईल. जॅक डोर्सी देखील अशा लोकांपैकी आहेत ज्यांच्याकडून ट्विटरने  ब्लू टिक काढून घेतला आहे. ट्विटरच्या सह-संस्थापकाने म्हटले आहे की ते ट्विटरवर ब्लू टिक्ससाठी पैसे देणार नाहीत. (हेही वाचा: Amitabh Bachchan On Elon Musk: ट्विटर 'ब्लू टिक' परत मिळताच अमिताभ बच्चन यांनी मानले एलन मस्क आभार; म्हणाले 'Tu cheez badi hai Musk Musk')

एकंदरीत असे म्हणता येईल की, आगामी काळात ट्विटरला अनेक मायक्रो ब्लॉगिंग साइट्सशी स्पर्धा करावी लागेल. यापैकी, Mastodon आणि भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo आधीच अनेक देशांमध्ये वापरकर्त्यांची पसंती बनत आहेत. अशा परिस्थितीत ब्लूस्काय सोबतच आणखी अनेक प्लॅटफॉर्म्सही लॉन्च होण्याच्या तयारीत आहेत.