Paytm (Photo Credits: ANI)

दिग्गज कंपनी पेटीएमच्या (Paytm) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, फिनटेक कंपनी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. दिवसभराच्या व्यवहारात पेटीएमचा शेअर जवळपास 9 टक्क्यांनी घसरून 528.10 रुपयांवर आला. माहिती मिळत आहे की, अलिबाबा ग्रुपने (Alibaba Group) पेटीएमची मूळ कंपनी One-97 Communications मधील आपली 3.1% ची बहुसंख्य हिस्सेदारी विकली आहे. अहवालानुसार, अलीबाबा ग्रुप कंपनी अँट फायनान्शिअलने पेटीएमचे $125 दशलक्ष किंवा सुमारे 1,125 कोटी रुपयांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले आहेत. अँट फायनान्शियलने भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमचे 2 कोटी शेअर्स 536.95 रुपये प्रति शेअर या दराने विकले आहेत.

यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये पेटीएममध्ये अलिबाबा समूहाचा 6.26% हिस्सा होता. आता त्यातील अर्धा हिस्सा अलिबाबाने विकला आहे. अलिबाबाच्या स्टेक सेलमुळे पेटीएमच्या शेअरमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. पेटीएमच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पेटीएमचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,145.90 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा नीचांक 438.35 रुपये आहे. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर सर्वात खालच्या पातळीवर गेला होता. पेटीएमचा स्टॉक एका वर्षात जवळपास 500 रुपयांनी घसरला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये, पेटीएममध्ये गुंतवणूक असणाऱ्या अनुभवी जपानी गुंतवणूकदार सॉफ्टबँकनेही पेटीएमचे शेअर्स विकले. पेटीएममध्ये सॉफ्टबँकेचा 17.45 टक्के हिस्सा होता, तो आता 12.9 टक्क्यांवर आला आहे. (हेही वाचा: Paytm भारताच्या UPI प्रोत्साहन योजनेचा प्रमुख लाभार्थी असेल; ग्लोबल ब्रोकरेज Morgan Stanley यांचा दावा)

दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा $2.5 बिलियन म्हणजेच 20,361 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आला. त्यावेळी हा देशातील सर्वात मोठा आयपीओ होता. परंतु, आयपीओ किंमतीनुसार, पेटीएमचे मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये होते, जे 35320 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे 1.04 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून पेटीएमने आपल्या गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.