5G Spectrum | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

5G Spectrum Auction: मोबाईल रेडिओवेव्ह सेवांसाठी 96,000 कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम लिलाव जवळपास 11,000 कोटी रुपयांच्या बोलीसह संपला. सरकारने या लिलावात 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 2500 MHz, 3300 MHz आणि 26 GHz स्पेक्ट्रम बँड ऑफर केले, ज्याची मूळ किंमत 96,238 कोटी रुपये आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सकाळच्या सत्रात कोणतीही नवीन बोली आली नाही. सुमारे 11,340 कोटी रुपयांच्या बोलीसह लिलाव संपला आहे.

स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी 25 जूनला प्रतिसाद उदासीन होता आणि लिलावाच्या 5 फेऱ्यांमध्ये सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सहभागी झाले होते. याद्वारे, दूरसंचार कंपन्या हाय-स्पीड 5जी सेवा देण्यासाठी स्पेक्ट्रम घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिलायन्स जिओने स्पेक्ट्रम लिलावासाठी सर्वाधिक 3,000 कोटी रुपये जमा केले. भारती एअरटेलने 1,050 कोटी रुपये जमा केले आणि व्होडाफोन आयडियाने 300 कोटी रुपये आगाऊ जमा केले. लिलावाच्या पहिल्या दिवशी दूरसंचार विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, प्रामुख्याने 900 आणि 1,800 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडमध्ये बोली लावण्यात आली. याशिवाय 3 सर्कलमध्ये 2,100 मेगाहर्ट्झ बँडसाठीही बोली लावण्यात आली होती. या लिलावात ठेवलेल्या इतर 5 स्पेक्ट्रम बँडसाठी पहिल्या दिवशी कोणतीही बोली लावली गेली नाही. केवळ 140-150 मेगाहर्ट्झची विक्री झाल्याचा अंदाज आहे. (हेही वाचा: AI-Powered Sex Dolls: चीन घेऊन येत आहे नेक्स्ट जनरेशन एआय सेक्स डॉल; देणार खऱ्या जीवनासारखा लैंगिक आनंद, जाणून घ्या काय आहे खास)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिलावात भारती एअरटेल सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून समोर आली आहे. याआधी 2010 मध्ये स्पेक्ट्रम विक्री प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्यापासूनचा हा 10वा लिलाव आहे. शेवटचा लिलाव 2022 मध्ये झाला होता, जो 7 दिवस चालला होता. त्यात, 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 5जी टेलिकॉम स्पेक्ट्रमची विक्रमी विक्री झाली. त्या लिलावात अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा जिओ सर्वाधिक बोली लावणारा ठरला होता. जिओने 88,078 कोटी रुपयांच्या सर्व एअरवेव्हपैकी निम्म्या जागा मिळवल्या होत्या. सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने 2022 च्या स्पेक्ट्रम लिलावात 43,084 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती, तर व्होडाफोन-आयडियाने 18,799 कोटी रुपयांना स्पेक्ट्रम खरेदी केले होते.