Tokyo Olympics 2020: आज 'या' खेळाडूंकडून आहे पदकाची अपेक्षा, चांगली कामगिरी करत गाठला पदकापर्यंतचा पल्ला
Tokyo Olympics 2020 (Photo Credits: Pixabay)

आज टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) गेम्समध्ये भारताच्या मोहिमेचा शेवटचा दिवस आहे. भारताला (India) शेवटच्या दिवशी आणखी तीन पदकांची (Medals) अपेक्षा आहे. गोल्फमध्ये (Golf) भारतासाठी रौप्य पदकाच्या आशा वाढवणाऱ्या सर्वांच्या नजरा सकाळी अदिती अशोकवर (Aditi Ashok) असणार आहेत. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) आज कांस्य पदकाचा सामना खेळणार आहे. याशिवाय अॅथलीटमध्ये नीरज चोप्राकडून (Neeraj chopra) इतिहास रचणे अपेक्षित आहे. गोल्फमध्ये भारतासाठी पदकाच्या आशा खूप वाढल्या आहेत. चौथ्या फेरीचे सामने शुक्रवारी खेळले जात असून अदिती अशोक दुसऱ्या क्रमांकावर कायम होती. मात्र अदिती अशोकला न्यूझीलंडच्या (New Zealand) खेळाडूकडून कठीण स्पर्धा मिळत आहे. अदिती अशोकचा शेवटचा शॉट चांगला नव्हता आणि ती आता तिसऱ्या स्थानावर गेली आहे. अमेरिकेचा खेळाडू गोल्ड आणि न्यूझीलंडचा खेळाडू आता रौप्य पदकाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.  जर अदिती अशोकने शनिवारीही तिच्या सर्वोत्तम कामगिरीची सुरूवात केली तर ती गोल्फमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरेल.

भारताचा बजरंग पुनियासाठी शुक्रवार हा निराशाजनक दिवस होता. उपांत्य फेरीचा सामना गमावल्यानंतर बजरंग पुनिया सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. पण शनिवारी बजरंग पुनिया कांस्यपदकासाठी उतरेल. बजरंग पुनियाच्या प्रशिक्षकाने आशा व्यक्त केली आहे की स्टार पैलवान कोणत्याही परिस्थितीत भारतासाठी कांस्यपदक आणेल.

आज भालाफेकचे अंतिम सामनेही खेळले जाणार आहेत. भारताचे नीरज चोप्रा अव्वल स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. नीरज चोप्रा भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाचा दावेदार आहे. जर नीरज चोप्रा सुवर्णपदक जिंकला, तर तो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरेल. नीरज चोप्रा आता सुवर्णपदकासाठी भारताची या दोघांनंतर शेवटची आशा आहे.

दरम्यान टोकियोमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. टोकियो शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. गोल्फ कोर्सवर अजून पाऊस पडलेला नाही.   पावसामुळे चौथ्या फेरीवर परिणाम झाला तर रविवार हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.