Ramesh Tikaram । Photo Credits: Twitter/ KirenRijiju

अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा बॅटमिंटन खेळाडू रमेश टीकाराम (Ramesh Tikaram) यांचे काल (16 जुलै) एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. 51 वर्षीय रमेश टीकाराम यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोविड 19 शी त्यांची दोन आठवड्यांपासून सुरू असलेली झुंज अपयशी ठरल्याने त्यांचे काल दुपारी निधन झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजूजू (Kiren Rijiju) यांनीदेखील त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

रमेश टीकाराम हे देशातील पहिले पॅरा बॅटमिंटन खेळाडू होते ज्यांना प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बंगळूरूमध्ये त्यांच्यावर कोविड 19 वर उपचार सुरू होते. 'स्वर्गीय श्री रमेश टीकाराम जी को साल 2002 में अर्जुन अवॉर्ड दिया गया था। देश का नाम रोशन करने वाले टीकाराम जी कोरोना से जंग हार गए।' असं ट्वीट करत किरण रिजूजू यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

किरण रिजूजू यांचे ट्वीट

रमेश टीकाराम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. रमेश यांच्या निधनावर क्रीडा विश्वातील नामवंत यांच्यासोबतच पॅरालंपिक इंडिया कडून देखील शोक व्यक्त करण्यात आला आहे. सध्या देशात कोरोना बाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार गेला आहे.