India vs Great Britain Women's Olympics Hockey Bronze Medal Match Live: भारत-ग्रेट ब्रिटन महिला हॉकी ऑलिम्पिक कांस्यपदक मॅच लाईव्ह कशी व कुठे पाहणार लाईव्ह?
भारत महिला हॉकी (Photo Credit: PTI)

IND vs GBR Women's Hockey Bronze Medal Match Live: इतिहास घडवण्याच्या निर्धाराने भारतीय महिला हॉकी (India Women's Hockey) संघ आज, 6 ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) हॉकी कांस्यपदक सामन्यात ग्रेट ब्रिटन (Great Britain) संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला 5-4 ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले आणि 41 वर्षांनंतर देशाला हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. आता महिला संघाचेही आपले पहिले ऑलिम्पिक पदक मिळवण्याचा निर्धार असेल. राणी रामपालच्या (Rani Rampal) नेतृत्वातील भारतीय हॉकी संघाकडून देशवासियांना मोठ्या आशा आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यातील कांस्य पदक सामना शुक्रवारी (6 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता खेळला जाईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी नॅशनलवर पाहता येईल तर कांस्य पदक सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी LIV अ‍ॅप (Sony LIV) आणि Jio TV वर पाहायला उपलब्ध असेल. (Tokyo Olympics 2020: पैलवान बजरंग पुनिया याच्यासह महिला हॉकी संघाला पदकाची संधी, पाहा 6 ऑगस्टचे संपूर्ण शेड्युल)

भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्जेंटिनाने बुधवारी उपांत्य फेरीत 2-1 ने जिंकून भंग केले होते. आता संघाचे लक्ष ऐतिहासिक कांस्यपदक जिंकण्यावर आहे. भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक खेळाच्या पहिले तीन सामने गमावले होते आणि त्यानंतर सलग तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मॉस्को येथे 1980 च्या खेळांमध्ये भारत महिला संघाने पहिली ऑलिम्पिक खेळली होती. त्यानंतर त्यांनी 2016 रिओ ऑलिम्पिक खेळात सहभाग घेतला पण त्यांना पदक सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशास्थतीत आता टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची आणि पुरुष संघानंतर भारतासाठी दुसरे हॉकी पदक पटकावण्याची सुवर्ण संधी आहे.

दुसरीकडे, ग्रेट ब्रिटनने ऑलिम्पिकमध्ये गतविजेता म्हणून प्रवेश केला होता. पण सुवर्णपदक परत मिळवण्याची संधी गमावल्याने कांस्यपदक त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असेल. ब्रिटनने यापूर्वी पूल A चकमकीत भारताला 4-1 ने पराभूत केले आहे त्यामुळे कांस्यपदक सामन्यासाठी त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. कांस्यपदकासाठी दोन्ही संघ आता एकमेकांच्या आमनेसामने येतील.