प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) होणार आहेत. त्यावर्षी या स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)ने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी त्यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या कॉमनवेल्थ स्पर्धेत क्रिकेटचा थरार पाहण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे.

यासंदर्भात आयसीसीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डा (Wales Cricket Board) च्या यजमानपदाखाली एक अर्ज केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आयसीसीने रितसर हा अर्ज पाठवला आहे. महिला क्रिकेट प्रेक्षकवर्ग निर्माण व्हावा तसेच क्रिकेट खेळणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा अर्ज करण्यात आला आहे. ‘महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी बर्मिंगहॅम हे योग्य ठिकाण आहे. या शहरातील 23 टक्के लोकं क्रिकेटशी निगडीत आहेत. पण, राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाल्यास, येथे क्रिकेट संस्कृती वाढेल’, असे रिचर्डसन यांनी सांगितले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच क्रिकेटचा सहभाग राहिला आहे. 1998 साली क्वालालंपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळला गेला होता, त्यात दक्षिण आफ्रिका संघ विजेता ठरला होता.