Delhi Capitals चे कर्णधारपद काढून घेतल्यावर श्रेयस अय्यरने सोडले मौन, Rishabh Pant वर केले धक्कादायक विधान
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 8 गडी राखून पराभूत केले. चार महिन्यांनी दिल्ली कॅपिटल्स संघात परतणाऱ्या श्रेयश अय्यरने (Shreyas Iyer) 47 धावांची नाबाद खेळी खेळली. यशस्वी पुनरागमनानंतर श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद गमावल्याबद्दल आपले मौन सोडले. अय्यरने मात्र पंतच्या कर्णधारपदाचे कौतुक केले. दरम्यान, संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा आदर करतो, असे अय्यरने म्हटले आहे. माजी कर्णधार म्हणाला, “रिषभ पंत (Rishabh Pant) सर्वोत्तम मार्गाने संघाचे नेतृत्व करत आहे. या हंगामाच्या प्रारंभापासून पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला खूप चांगले सांभाळले आहे. संघाला विजय मिळवून देणे हे माझे ध्येय आहे.” यंदा इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे अय्यरला चार महिने मैदानातून दूर राहावे लागले आणि दिल्ली कॅपिटल्सने पंतला कर्णधार म्हणून नियुक्त केले. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर असल्याने पंतला अय्यरऐवजी कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले. (IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा दिमाखदार विजय, SRH ला 8 विकेटने धूळ चारून प्लेऑफच्या दिशेने उचलले आणखी एक पाऊल)

पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्याचे कारणही अय्यरने स्पष्ट केले. अय्यर म्हणाला, “पंतचे काम चांगले झाले आहे आणि म्हणून पंतला संघ व्यवस्थापनाच्या वतीने संपूर्ण हंगामासाठी संघाची कमान देण्यात आली आहे. कर्णधारपदाच्या बाबतीत मी संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाचा पूर्ण आदर करतो.” 2018 मध्ये गौतम गंभीरने मधेच दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने अय्यरला त्याचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी सातत्याने सुधारत गेली. 2019 मध्ये संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. त्यानंतर 2020 मध्ये एक पाऊल पुढे जात त्यांनी पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला पण मुंबई इंडियन्सकडून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला.

श्रेयस अय्यरने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सच्या सनरायझर्स हैदराबादवर आठ विकेटच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. स्टायलिश मुंबईकर फलंदाजाने नाबाद 47 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सने 175 षटकांत 135 धावांचे आव्हान आठ गडी राखून पूर्ण केले. अय्यर पुढे म्हणाला की, मैदानावर परत आल्याने तो आनंदी आहे पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या कामगिरीवर समाधानी नाही, कारण त्याची भूक वाढली आहे.