RR vs DC IPL 2021: Rishabh Pant एकटा झगडला, उनाडकट-मुस्तफिजुरच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्ली फलंदाजांची शरणागती; राजस्थानला विजयासाठी 148 धावांचे आव्हान
जयदेव उनाडकट (Photo Credit: Twitter/@IPL)

RR vs DC IPL 2021: राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) आयपीएलच्या (IPL) सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फलंदाजांनी जयदेव उनाडकट (Jayadev Unadkat) आणि मुस्तफिजुर रहमानच्या (Mustafizur Rahman) भेदक गोलंदाजीपुढे शरणागती पत्करली. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) कॅप्टन्सी खेळी करत 51 धावांचा झुंजार डाव खेळला आणि कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावांपर्यंत मजल मारली. टॉम कुरनने 21 तर पदार्पणवीर ललित यादवने (Lalit Yadav) 20 धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या आघाडीचे तीनही फलंदाज- पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे आजच्या सामन्यात एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. दिल्लीकडून क्रिस वोक्स 15 धावा आणि कगिसो रबाडा 9 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून विरोधी संघावर दडपण आणले होते. संघाकडून पहिला सामना खेळणार उनाडकटने चमकदार कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या मुस्तफिजुरला 2 आणि क्रिस मॉरिसने 1 गडी बाद केला. (RR vs RC IPL 2021: हवेत इंच उडी घेऊन Sanju Samson ने एका हाताने पकडला अविश्वसनीय कॅच, पाहून व्हाल फॅन Watch Video)

आयपीएलच्या सातव्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये रॉयल्सचा वेगवान गोलंदाज उनाडकटने धोकादायक शॉचा अढथळा दूर करत त्याला माघारी धाडलं. त्यापाठोपाठ चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर उनाडकटने दिल्लीचा दुसरा सलामीवीर धवनला बाद केलं. विकेटकीपर-कर्णधार सॅमसनने धवनचा अफलातून झेल पकडला आणि त्याला तंबूत धाडलं. धवननंतर मैदानात उतरलेल्या रहाणेकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, रहाणेनं जयदेवच्याच गोलंदाजीवर सोपा झेल दिला ज्यामुळे 6 ओव्हर्सनंतर दिल्लीची स्थिती 36 धावांवर 3 विकेट अशी झाली. उनाडकटपाठोपाठ मुस्तफिझूरने आपली करामत दाखवत धोकादायक मार्कस स्टॉइनिसला झेलबाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. अखेर कर्णधार पंतसह नवोदित ललित यादवने डाव सावरला. यादरम्यान, पंतने अर्धशतक फटकावत दिल्लीला 12 ओव्हर्सनंतर 86 धावांपर्यंत पोहचवले. मात्र, नंतर रियान परागने आपल्याच बॉलिंगवर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंतला धावचीत करून तंबूत पाठवलं. पंतनंतरही संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. पंतसोबत डाव सावरणारा यादव 20 धावांवर असताना फटका मारताना बाद झाला.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. दिल्लीने शिमरॉन हेटमायरच्या जागी रबाडा तर ललित यादवला पदार्पणाची संधी दिली. दुसरीकडे, रॉयल्सने बेन स्टोक्सच्या जागी डेविड मिलर आणि श्रेयस गोपालला विश्रांती देत उनाडकटचा समावेश केला आहे.