RR vs DC IPL 2021 Match 7: भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरोधात होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) सातव्या सामन्यात एक मोठा विक्रम खुणावत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेटचा टप्पा गाठण्यापासून ऑफ स्पिनर फक्त एक विकेट दूर आहे. खेळाच्या छोट्या स्वरूपात 249 विकेट्स घेतलेला अश्विन आजच्या सामन्यात मैलाचा दगड गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल. अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) 139 विकेट्स आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 52 गडी बाद केले आहेत, तर उर्वरित त्याने घरगुती क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत. लसिथ मलिंगा, अमित मिश्रा, पियुष चावला, ड्वेन ब्रावो आणि हरभजन सिंह यांच्यानंतर 34 वर्षीय फिरकीपटू सर्वाधिक विकेट घेणारा सहावा गोलंदाज आहे. 2009 पासून आयपीएल खेळणाऱ्या अश्विनने आतापर्यंत 155 सामने खेळले आहेत. (RR vs DC IPL 2021 Match 7 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, व कसा पाहणार?)
2011 आयपीएलमध्ये अश्विनने 20 विकेट्स घेतल्या होत्या जी त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर आयपीएलच्या प्रत्येक मोसमात अश्विनने 10 हून अधिक गडी बाद केलेले आहेत. इतकंच नाही तर गेल्या वर्षी तामिळनाडू अष्टपैलू खेळाडूने कॅपिटल्ससाठी खेळलेल्या 15 सामन्यात 13 गडी बाद केले होते. विशेष म्हणजे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात अश्विनने एक विकेट घेताच तो टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल. यापूर्वी भारतीय अमित मिश्राने देशासाठी हे शिखर सर केले आहेत. मिश्राने आजवर एकूण 256 गडी बाद केले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 16 विकेट्सचा समावेश आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल 2021 मोहिमेविषयी बोलायचे तर टीम गुरुवारी राजस्थान रॉयल्सशी सामना करण्यास सज्ज झाली आहे. दिल्लीने यापूर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरचे पाचही सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिल्या सामन्यात मिळालेला विजय संघासाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीसाठी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने सीएसकेविरुद्ध दिल्लीला शानदार सुरुवात करून दिली ज्यामुळे कॅपिटल्सने 8 विकेटने सामन्यात सहज विजय मिळवला.