मुंबईच्या 19 वर्षीय खेळाडूची कमाल, सलग 72 तास फलंदाजी करून केला विक्रम; Guinness Book of World Records मध्ये नोंद होणार?
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

क्रिकेटच्या (Cricket) मैदानात जवळपास प्रत्येक सामन्यात कोणता ना- कोणता खेळाडू नव-नवीन विक्रमाची नोंद करत असतो. आणि आता एक युवा क्रिकेटपटू आणखी एक विक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईचा 19 वर्षीय युवा फलंदाज सिद्धार्थ मोहिते (Siddharth Mohite) 72 तास सतत फलंदाजी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) आपले नाव नोंदवण्याच्या प्रयत्नात असून या प्रयत्नात त्याने 50 तासांहून अधिकचा कालावधी पूर्ण केला आहे. यासह त्याने 2015 मध्ये पुण्याच्या विराग मारे (Virag Mare) याचा 50 तासांचा वैयक्तिक फलंदाजी सत्राचा विक्रमही मोडला. 19 वर्षीय सिद्धार्थचा दावा आहे की तो शुक्रवारी रात्रीपासून नेटमध्ये आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स डॉट कॉमनुसार, मारे याने 50 तास 4 मिनिटे 51 सेकंद बॅटिंग करून नवा विश्वविक्रम नोंदवला होता. मारे याने गोलंदाज आणि बॉलिंग मशीन यांचा सामना केला, तर सिद्धार्थ फक्त गोलंदाजांचा सामना करत आहे.

मोहितेला काहीतरी वेगळं करायचं होतं ज्याचा प्रयत्न अनेक क्रिकेटपटू करत नाहीत. नेटमध्ये 72 तास न थांबता फलंदाजी करण्याचा मानस त्याने आपल्या प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्याकडे व्यक्त केला. सिंग यांनी सुरुवातीला मोहिते याचा निर्णय गंभीरतेने घेतला नाही, पण त्याने पुन्हा तीच विनंती घेऊन आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपले नाव पाठवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार कोणतेही रेकॉर्ड प्रमाणित करण्यासाठी, स्वतंत्र साक्षीदार आवश्यक आहेत. मोहिते याचा चुलत भाऊ वैभव पवार याने तीन दिवस मोहिते याच्या फलंदाजीवर नजर ठेवण्यासाठी साक्षीदारांची व्यवस्था केली. मोहितेने खेळलेल्या प्रत्येक चेंडूचा रेकॉर्ड करण्यासाठी हे साक्षीदार चार तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. साक्षीदार ब्रेकची संख्या आणि कालावधी देखील लिहितात. तसेच एका माणसाला त्याच्या फलंदाजीचा  व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्याचे काम दिले आहे.

दरम्यान, वृत्तात पुढे म्हटल्यानुसार सिद्धार्थला प्रत्येक तासाला 5 मिनिटे ब्रेक घेण्याची परवानगी आहे. तो वॉशरूममध्ये जाण्यासाठी ब्रेक घेऊ शकतो. तर हवे असल्यास तो ब्रेक न घेता तासन्तास फलंदाजी करू शकतो. तसेच नेट्स जवळ काही बेडची व्यवस्था करण्यात आली असून खाद्य पदार्थांची पाकिटे देखील ठेवण्यात आली आहेत. सिद्धार्थ केवळ प्रथिनेयुक्त पदार्थ आणि पेय घेत आहे, जेणेकरून त्याच्या शरीराला दीर्घकाळ फलंदाजी करण्यासाठी ऊर्जा मिळू शकेल. विशेष म्हणजे या विश्वविक्रमात मोहितेला साथ देण्यासाठी गोलंदाजांचा एक गट त्याच्यासोबत राहिला.