इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या सामन्यात आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers hyderabad) यांच्यात सामना होत आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 142 धावा केल्या आणि विजयासाठी केकेआरला 143 धावांचे लक्ष्य दिले. हैदराबादकडून कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेअरस्टोने चांगली सुरुवात केली. मात्र टीमला याचा फायदा होऊ शकला नाही. हैदराबादकडून मनीष पांडेने (Manish Pandey) अर्धशतकी डाव खेळत सर्वाधिक 51 धावा केल्या. वॉर्नर 36 धावा करून बाद झाला, तर पहिल्या सामन्यात अर्धशतकी डाव खेळणारा बेअरस्टो आज 5 धावाच करू शकला. रिद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) 30 धावा केल्या. अभिषेक शर्मा 2 आणि मोहम्मद नबी 12 धावा करून नाबाद परतले. कोलकाताने आज चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. कोलकाताने सनरायझर्सवर सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले आणि टीमला मोठी धावसंख्या करू दिली नाही. केकेआरकडून आज पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (KKR vs SRH, IPL 2020: 2018मध्ये खरेदी केलेल्या कमलेश नागरकोटीने 2 वर्षानंतर KKRकडून केले डेब्यू, जाणून त्याच्याबद्दल माहित नसलेल्या 'या' गोष्टी)
वॉर्नर आणि बेअरस्टोने सनरायझर्सच्या डावाची सुरुवात केली. कमिन्सने 24 धावांवर टीमला पहिला झटका दिला. कमिन्सने बेअरस्टोला 5 धावांवर माघारी पाठवले. यापूर्वी चौथ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर अंपायरने बेअरस्टोला कॅच आऊट दिले, पण DRSमध्ये तो नाबाद असल्याचे दिसला. मात्र पुढच्याच चेंडूवर कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला आणि त्याला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर वॉर्नरला 36 धावांवर वरूण चक्रवर्तीने बाद केले. दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतल्यावर मनीष आणि साहाच्या जोडीने डाव पुढे नेला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि टीमला धावांपर्यंत मजल मारून दिली. या दरम्यान मनीषने 35 चेंडूत 16 वे आयपीएल अर्धशतक ठोकले. यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. दोन्ही सलामी फलंदाज बाद झाल्यावर मनीषने एकाकी झुंज दिली आणि हैदराबादला 142 धावांपर्यंत मजल मारून दिली.
दरम्यान, यापूर्वी आजवर झालेल्या सात सामन्यात टॉस जिंकणारा संघाचा पहिले गोलंदाजी करण्याकडे आपला भर देत होता. परंतू सनराईजर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने ही परंपरा मोडली आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी वॉर्नरने संघात 3 बदल केले असून मोहम्मद नबी, खालील अहमद आणि रिद्धिमान साहा यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे, केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी यांना सामील केले.