आयपीएल (IPL) 2021 च्या 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना इन-फॉर्म दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) अबू धाबी येथे सुरु आहे. नाणेफेक गमावून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीला चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाने पॉवर-प्लेमधेच दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. श्रेयस अय्यर आणि कर्णधार रिषभ पंत यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ते देखील मोठेही खेळी करण्यात अपयशी ठरले. सनसनाटी वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी (Kartik Tyagi), ज्याने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला, त्यानेही या सामन्यात एक शानदार सुरुवात केली आहे. ऑरेंज कॅप धारक शिखर धवनचा (Shikhar Dhawan) त्रिफळा उडवून कार्तिकने आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. कार्तिक त्यागीने धवनला त्याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले. (IPL 2021, DC vs RR: राजस्थानचा वेग पाहून दिल्लीचे वाघ गारद; रॉयल्सला विजयासाठी अवघे 155 धावांचे लक्ष्य)
‘गब्बर’ने बॅकफूटवर असताना राजस्थानच्या युवा वेगवान गोलंदाजाच्या आत येणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटचा आतील किनार घेऊन स्टंपला लागला. आणि 7 चेंडू खेळल्यानंतर फक्त 8 धावा करून धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. शिखर बाद झाल्यावरच शॉ देखील घाईत दिसला आणि त्याने चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर लियाम लिव्हिंगस्टोनकडे झेलबाद होऊन माघारी परतला. लक्षात घ्यायचे म्हणजे या सामन्यात दिल्लीचा संघ केवळ तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरला आहे. पंतने मार्कस स्टोइनिसच्या जागी ललित यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. स्टोइनिसला गेल्या सामन्यात मांडीला दुखापत झाली होती. तसेच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जवळ येत असल्याने कदाचित संघाने स्टोइनिसला आवश्यक अशी विश्रान्ती देण्याचा निर्णय घेतला असेल.
https://t.co/CoCFIT325d#RRvsDC #DCvRR #IPL2021 @IPL
— I_am_Priya (@marathimulgii) September 25, 2021
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. संघाने एविन लुईस आणि क्रिस मॉरिसच्या जागी डेविड मिलर आणि तबरेज शम्सी यांचा समावेश केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय नंबर एक फिरकीपटू शम्सी पहिल्यांदा आयपीएल खेळत आहे. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे लुईस या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. मिलरला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तर गेल्या सामन्यातील मॉरिसची कामगिरी चेंडूने अत्यंत खराब झाली आणि त्याने त्याच्या 4 षटकांत 47 धावा दिल्या. यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. शम्सीचा अलीकडील फॉर्म जबरदस्त आहे आणि तो अबू धाबीच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो.