Jasprit Bumrah (Photo Credit - X)

Jasprit Bumrah Ruled Out of ICC Champions Trophy 2025: जानेवारीमध्ये सिडनी कसोटीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे बुमराह (Jasprit Bumrah ) पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या व्हाईट बॉल मालिकेतूनही बाहेर पडला. आता हा स्टार भारतीय वेगवान गोलंदाज पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. बुमराहने आठवड्याच्या शेवटी बेंगळुरूमध्ये केलेल्या नवीनतम स्कॅनमध्ये काहीही मोठे आढळले नाही. मात्र, असे असले तरी तो अद्याप गोलंदाजी करू शकणार नाही. बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथील बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जाईल.

बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय निवड समितीने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून आला आहे, ज्यामध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीलाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने यशस्वी जयस्वालची जागा घेतली आहेय ज्याचा यापूर्वी हंगामी संघात समावेश करण्यात आला होता.

टीम इंडियाचा संघ:

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

पर्यायी खेळाडू:

यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांना पर्यायी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. गरज पडल्यास हे तिन्ही खेळाडू दुबईला जातील.

अलिकडच्या काळात भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडिया एक मजबूत प्रतिस्पर्धी दिसत आहे. बुमराहची अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का आहे, परंतु हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती सारख्या तरुण खेळाडूंना संधी मिळाल्याने संघाला नवीन आशाही आहेत.