आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामाचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. यासाठी 292 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे, ज्यात 10 खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल सोडून दोन भारतीय हरभजन सिंह आणि केदार जाधव या बेस प्राईस विभागात आहेत. त्यामुळे, यंदा कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या आयपीएलमध्ये (IPL) सर्वात महागडा क्रिकेटपटूचा विक्रम 6 वर्षांपासून टीम इंडियाचा माजी मॅच-विनर युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) नावावर आहे. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले होते आणि 2015 हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Daredevils) आता दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने त्याला सर्वाधिक 16 कोटींची बोली लावून खरेदी केली मात्र, हंगामात युवीला काही खास करता आले नाही. त्याने 14 सामन्यात 248 धावा केल्या आणि विकेट घेतली. मात्र अद्याप लिलावात युवीचा रेकॉर्ड कोणीलाही मोडला आला नाही. (IPL 2021 Auction: कमी बेस प्राईज असलेल्या ‘या’ 3 खेळाडूंवर आयपीएल लिलावात पाडू शकतात पैशांचा पाऊस, बनू शकतात करोडपती)

दरम्यान, युवराजवर मोठी बोली लागवल्याच्या 5 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 2020 लिलावात युवीचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहचला होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने 15.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मागील मोसमातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या कमिंसला युवीचा विक्रम मोडता आला नसला तरी तो नक्कीच सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आणि तो रेकॉर्ड आद्यपही कायम आहे. दरम्यान, यंदा आयपीएल लिलावात 2 कोटी रुपयांची बेस प्राईस असलेल्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथसह इंग्लंडचे अव्वल 5 खेळाडू मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड व बांग्लादेशी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

दरम्यान, आयपीएल लिलावात शॉर्टलिस्ट केलेल्या 292 खेळाडूंपैकी 164 भारतीय, 128 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 3 खेळाडू सहयोगी देश अफगाणिस्तान, नेपाळ आणि युएई देशाचे आहेत. 8 फ्रँचायझींना एकूण 61 स्लॉट भरायचे आहेत, तर त्यांच्या सर्वांकडे मिळून पर्समध्ये एकूण 196.6 कोटी रुपये शिल्लक आहेत.