उमेश यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात नवीन चेंडूने कहर सुरूच ठेवला आहे. उमेश यादवने सलग तीन सामन्यांत आपल्या पहिल्याच षटकात नव्या चेंडूवर विकेट घेत कोलकात्याला चांगली सुरुवात करून दिली. यादवने पहिल्याच षटकात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल याला पायचीत करून केकेआरला (KKR) पहिले यश मिळवून दिले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मयंक अवघ्या एका धावेवर काढून उमेशचा बळी ठरला. T20 फॉरमॅटमध्ये पॉवरप्ले विकेट्स मिळवणे खूप महत्वाचे मानले जाते, आणि उमेश यादव अजूनही कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे कार्य चोख बजावत आहे. यासोबत त्याने त्याची 50 वी पॉवरप्ले विकेटही पूर्ण केली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवने या मोसमात आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या असून पर्पल कॅप काबीज केली आहे. (IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाबच्या फलंदाजांची हाराकिरी; कोलकातासमोर विजयासाठी अवघे 138 धावांचे आव्हान)

दरम्यान, पॉवरप्लेमध्ये 50 बळी घेणारा यादव हा चौथा गोलंदाज आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या पॉवरप्लेमध्ये 52 विकेट्स आहेत. तर संदीप शर्माने देखील 52 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात संदीप पंजाबकडून खेळत आहे, पण त्याला या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. याशिवाय भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज यादवने पहिल्या 6 षटकात 51 विकेट्स घेतल्या आहेत. 34 वर्षीय उमेशने 2010 मध्ये दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर उमेशने आपल्या गतीने सर्वांना प्रभावित केले. गेल्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2020 मध्येही उमेशला अवघ्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली.

यापूर्वी उमेश यादवने कोलकात्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध देखील चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने आरसीबीचा सलामीवीर अनुज रावतला त्याच्या डावाच्या तिसऱ्या चेंडूवर शेल्डन जॅक्सनकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले होते. या सामन्यात यादवने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. रावतनंतर उमेशने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीची विकेट घेत आरसीबीला दबावात टाकले. मात्र, या सामन्यात कोलकाताला बेंगलोरविरुद्ध शेवटच्या षटकात पराभवाला सामोरे जावे लागले.