IPL 2022: मेगा लिलावापूर्वी ‘या’ 2 भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना फ्रँचायझी सर्वात पहिले करणार रिटेन, भल्या-भल्या दिग्गजांवर पडलेत भारी!
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मेगा लिलावापूर्वी बहुतेक संघ सामान्यतः अशा खेळाडूंना कायम ठेवतात ज्यांनी आयपीएल (IPL) तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर थैमान घातले आहे. परंतु यंदा असे काही खेळाडू बाजी मारू शकतात ज्यांच्याकडे फक्त देशांतर्गत सामन्यांचा अनुभव आहे. आयपीएल 2022 मागील काही हंगामांपेक्षा वेगळे असेल कारण दोन नवीन संघ स्पर्धेत सामील होणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद ही दोन नवीन फ्रँचायझी आहेत जी आयपीएलच्या 2022 हंगामातुन स्पर्धेत पदार्पण करणार आहेत. दोन नवीन फ्रँचायझींमुळे IPL 2022 पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. (IPL 2022: मुंबई इंडियन्स ‘या’ 3 तडाखेबाज खेळाडूंना करू शकते रिटेन, ‘या’ स्टार अष्टपैलूचा पत्ता कट होणे निश्चित?)

इंडियन प्रीमियर लीग 2022 मेगा लिलावापूर्वी, सर्व 8 संघांना 4 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल. आयपीएल 2021 दरम्यान असे अनेक युवा खेळाडू समोर आले आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही परंतु आपल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. आज आपण अशाच 2 अनकॅप्ड खेळाडूंवर नजर टाकूया ज्यांना फ्रँचायझी पुढील वर्षासाठी कायम ठेवू शकतात.

1. हर्षल पटेल (Harshal Petel)

विराट कोहलीच्या आरसीबीचा युवा गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल 2021 मध्ये खळबळ उडवून दिली. त्याने 15 सामन्यात 14.34 च्या सरासरीने आणि 8.14 च्या स्ट्राईक रेटने रेकॉर्ड-ब्रेक 32 विकेट घेतल्या आणि पर्पल कॅप काबीज केली. हर्षलने चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक घेत सर्वांनाच चकित केले. 16व्या षटकात त्याने हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड आणि राहुल चहर यांना सलग 3 चेंडूत पॅव्हिलियनमध्ये पाठवले. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ हर्षलला दुसऱ्या गमावण्याची धोका पत्करू शकत नाही.

2. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)

कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज व्यंकटेश अय्यरने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले. IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात त्याने एकही सामना खेळला नाही पण दुसऱ्या टप्प्यात त्याने शानदार फलंदाजी केली आणि केकेआरला अंतिम फेरीत मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने हंगामातील 10 सामन्यांमध्ये 41.11 च्या सरासरीने आणि 128.47 च्या स्ट्राइक रेटने 370 धावा ठोकल्या. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर व्यंकटेशने 23.00 ची सरासरी आणि 8.11 च्या इकॉनॉमी रेटने 3 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत शाहरुख खानची टीम त्याला कोणत्याही किंमतीत कायम ठेवू इच्छित असेल.