IPL 2022, SRH vs PBKS Match 70: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 चा अंतिम लीग सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नुकताच पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने आपल्या मोहिमेचा शेवट गोड करत हैदराबादवर 5 गडी राखून मात केली. पंजाबच्या विजयात हरप्रीत ब्रार (Harpreet Brar), नॅथन एलिस आणि लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. ब्रार आणि एलिसच्या भेदक गोलंदाजीने सरायझर्सला 157 धावांत रोखले, तर लिविंगस्टोनच्या वादळी खेळीने पंजाबला 15.1 षटकांत 5 बाद विजयीरेष ओलांडून दिली. शिखर धवन ने 39 धावा केल्या. तसेच लिविंगस्टोनने झटपट फलंदाजी करत 22 चेंडूत 49 धावा चोपल्या. पंजाबचा 14 सामन्यातील सातवा विजय ठरला आणि ते 14 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर पोहोचले. तर हैदराबादला आठव्या पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांचे क्रमवारीतील आठवे स्थान अबाधीत आहे. (IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूंना टी-20 संघात नाही मिळाली संधी; चाहते संतापले)
हैदराबादने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबने तीन झटपट विकेट्स गमावल्या. जॉनी बेअरस्टो 23, शाहरुख खान 19 आणि कर्णधार मयंक अग्रवाल अवघ्या एका धावेवर बाद झाले. पण धवनने एक बाजू धरून फलंदाजी केली आणि त्याला लिविंगस्टोनची मोलाची साथ मिळाली. लिविंगस्टोनने येताच हैदराबादच्या फलंदाजांवर हल्ला चढवला. मोक्याच्या क्षणी धवनही बाद झाला. यानंतर लिविंगस्टोन आणि जितेश शर्माने गियर बदलला आणि जोरदार फटकेबाजी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. जितेश शर्मा धावा करून नाबाद परतला. तसेच हैदराबादसाठी फजलहक फारुकीने दोन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर आणि जगदीशा सूचितने 1-1 विकेट घेतली. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली, तर रोमारिओ शेफर्डने 26 आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
दरम्यान, हैदराबाद आणि पंजाब संघाच्या सामन्याने आयपीएल 2022 चे साखळी सामने संपुष्टात आले आहेत. आणि गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात प्लेऑफचे तीन व फायनल सामना खेळला जाणार आहे. 24 आणि 25 मे रोजी क्वालिफायर 1 व एलिमिनेटर सामना खेळला जाईल. तर, 27 मे रोजी क्वालिफायर 2 आणि 29 मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.