IPL 2022, PBKS vs SRH: सनरायझर्स विजयरथावर स्वार, पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडून 7 विकेटने पाजले पराभवाचे पाणी; पूरन-मार्करमची धमाकेदार फलंदाजी
सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs SRH: आयपीएलच्या 28 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने सात गडी राखून पंजाब किंग्सविरुद्ध 18.5 षटकांत दिमाखात विजय मिळवला आणि चौथा विजय खिशात घातला. हैदराबादच्या विजयात उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार यांच्यासह निकोलस पूरन आणि एडन मार्करम यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या आक्रमक गोलंदाजीने हैदराबादने पंजाबला 151 धावांत रोखले. प्रत्युत्तरात संघाने बॅटने आपली लय कायम ठेवून पंजाबला सहा सामन्यातील तिसरा पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. ‘ऑरेंज आर्मी’कडून राहुल त्रिपाठीने 34 आणि अभिषेक शर्माने 31 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच पूरन 35 धावा आणि मार्करम 41 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, राहुल चाहरने पंजाबकडून सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाने एक गडी बाद केला. (IPL 2022, PBKS vs SRH: पंजाब फलंदाजांच्या नाकात दम केलेल्या Umran Malik याला Liam Livingstone ने शिकवला धडा, 106 मीटरचा खणखणीत षटकार खेचल)

सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक गमावून पंजाबने दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला पहिला झटका कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने बसला. विल्यमसन बाद झाल्यावर सलामीवीर अभिषेकने हैदराबादचा गेल्या सामन्यातील मॅचविनर राहुल त्रिपाठीच्या साथीने धावफलक हलता ठेवला. दोंघांमध्ये 48 धावांची भागीदारी झाली असताना चाहरच्या फिरकीत अडकून त्रिपाठी स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाने सलामीवीर अभिषेक याची तिसरी विकेट झटपट गमावली. अशा परिस्थितीत पूरन आणि मार्करम हे दोन नवीन फलंदाज क्रीजवर होते. दोंघांनी संयमाने फलंदाजी करून पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात विजयासह हैदराबादने पॉईंट टेबलमध्ये गरुड झेप घेऊन टॉप-4 मध्ये प्रवेश केला आहे.

तत्पूर्वी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवरील हंगामातील 29 व्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि उमरान मलिक व भुवनेश्वर कुमार यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर पंजाबला 151 धावांवर गुंडाळले. सामन्यात पंजाबकडून शाहरुख खान 26, लियाम लिविंगस्टोन 60 आणि ओडियन स्मिथ 13 धावा करून बाद झाले. तर आघाडीचे फलंदाज - शिखर धवन, प्रभसिमरन सिंह, जॉनी बेअरस्टो आणि जितेश शर्मा बॅटने फारसे योगदान देण्यात अपयशी ठरले.