IPL 2022, PBKS vs GT: राहुल तेवतियाचा विजयी षटकार, शुभमन गिल याची जबरा खेळी, रोमहर्षक सामन्यात गुजरातची विजयी Hat Trick
शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs GT: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएलच्या (IPL) 16 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 6 विकेटने दारुण पराभव करून विजयाची हॅटट्रिक साजरी केली. गुजरातच्या विजयात संघाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने महत्वपूर्ण योगदान दिले. पंजाबने दिलेल्या 190 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमनने 59 चेंडूत 96 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने 35 धावा आणि कर्णधार हार्दिक पांड्या 35 धावा केल्या. शुभमनच्या आक्रमक फलंदाजीपुढे पंजाबचे गोलंदाज हतबल दिसले. तसेच अखेरच्या दोन बॉलवर 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने सलग षटकार खेचले आणि गुजरातच्या झोळीत तिसरा विजय पाडला. (IPL 2022, GT vs PBKS Match 16: शिखर धवन बनला एक हजारी मनसबदार; विराट, रोहितलाही जमली नाही अशी करामात करणारा बनला पहिला भारतीय)

पंजाबने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिलने आक्रमक पवित्रा घेत ताबडतोड फलंदाजी केली, तर मॅथ्यू वेड सावध दिसला. रबाडाने वेड याला अवघ्या 6 धावांवर बाद करून गुजरात संघाला मोठा झटका दिला. पण नंतर फलंदाजीला आलेल्या नवोदित साई सुदर्शन याने गिलला चांगली साथ देत संघाला विजयाच्या जवळ नेले. दोघांमधील दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीने संघाच्या विजयाचा मजबूत पाय रचला. पण 133 धावसंख्येवर सुदर्शन राहुल चाहरच्या फिरकीत अडकला आणि माघारी परतला. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 19 धावांची गरज होती. मात्र या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक धावबाद झाला. तेवतियाने दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली तर मिलरने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवर मिलरने एकच धाव घेऊन तेवतियाला विजयाची जबाबदारी सोपवली. पाचव्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. आणि तेवतियाने पुन्हा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून रोमांचक सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, पंजाबकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक दोन आणि राहुल चाहरने एक विकेट काढली. अशाप्रकारे पंजाबला आपल्या दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर आतापर्यंत गुजरात एकमेव अजेय संघ ठरला आहे.

पंजाब किंग्जने गुजरातविरुद्ध प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत 9 बाद 189 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबसाठी लियाम लिविंगस्टोन याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवून 27 चेंडूत सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. तर शिखर धवनने 30 चेंडूचा सामना करून 35 धावा केल्या. तसेच राहुल चाहरने शेवटी षटकांमध्ये 14 चेंडूत 22 धावांची खेळी करून अंतिम क्षणी संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, गुजरातकडून राशिद खानने तीन विकेट घेतल्या.