IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या आता मोठे बदल, सलग दोन पराभवानंतर ‘या’ मात्तब्बर खेळाडूंना दाखवला जाईल रस्ता!
जसप्रीत बुमराह आणि किरॉन पोलार्ड (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात माजी आयपीएल (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात निराशाजनक राहिली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबईला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. मुंबईची खराब फलंदाजी यामागचे मुख्य कारण ठरली. त्यामुळे मुंबईच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होताना दिसू शकतात. मुंबई इंडियन्स आपल्या पुढील सामन्यात 6 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) भिडणार आहेत. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब प्रदर्शन करणे काही नवीन बाब नाहीय. परंतु मुंबईला विजयाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा आस्वाद घेणे भाग पडले आहे. राजस्थानच्या गोलंदाजांचा तोड काढण्यात मुंबईच्या तोडफोड ब्रिगेडचे दिग्गज फलंदाजही अपयशी ठरले. या निराशाजनक प्रदर्शनानंतर मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन आगामी सामन्यासाठी काही खेळाडूंना बेंचवर बसवू शकते. (IPL 2022, MI vs RR : मुंबईची हाराकिरी सुरूच, राजस्थानविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर निराश रोहित शर्मा पहा काय म्हणाला?)

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात तीन विकेट घेणारा बसिल थंपी राजस्थानविरुद्ध चांगलाच महागडा ठरला. त्याने एक ओव्हर गोलंदाजी केली आणि 26 धावा लुटल्या. याशिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच अनमोलप्रीत सिंह बॅटने दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात 5 धावाच केल्या. त्यानंतर फिरकी गोलंदाज मुरगन अश्विनबोलायचे तर त्याने पहिल्या सामन्यात 2 विकेट घेतल्या तर रॉयल्सविरुद्ध तो अपयशी ठरला. यादरम्यान त्याने अनुक्रमे 14 आणि 32 धावा खर्च केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाचा डॅनियल सॅम्स आणि सिंगापूरचा फलंदाज टिम डेविड देखील प्रभावी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पराभवाची हॅटट्रिक हलण्याच्या उद्देशाने मुंबई कदाचितच या खेळाडूंना पुढील सामन्यात संधी देण्याची चूक करेल.

दुसरीकडे, वरील खेळाडूंना बेंचवर बसवून त्यांच्या जागी योग्य खेळाडूंची निवड जाण्यासाठी मुंबईने सावधगिरीने निर्णय घेण्याची गरज आहे. मुंबईच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादव पुन्हा परतण्याची शक्यता आहे, तर टीम डेविडच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अंडर-19 स्टार डेवाल्ड ब्रेविस एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच फॅबियन ऍलन आणि जयदेव उनाडकट देखील घातक खेळाडू देखील मुंबईच्या ताफ्यात आहेत, जे वरील खेळाडूंची जागा घेऊ शकतात.