IPL 2022 Playoff Qualification Scenarios: चार सामन्यात पराभवाची माती खाल्लेले CSK, मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये मारणार का एन्ट्री?
रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

IPL 2022 Playoff Qualification Scenarios: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पाच वेळा माजी आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स  (Mumbai Indians) संघाचा 7 गडी राखून पराभव केला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही संघांनी या मोसमात आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मुंबई आणि चेन्नई संघ आतापर्यंत प्रत्येकी 4-4 सामने खेळलेले असून चारही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थतीत आता आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दोन्ही संघाची वाट आणखी बिकट झाली आहे. मुंबई पॉईंट टेबलमध्ये 9 व्या तर चेन्नई 10 व्या क्रमांकावर तळाशी बसले आहेत. (IPL 2022 Points Table Updated: चार सामन्यानंतर मुंबई, CSK संघाची विजयाची पाटी कोरीच; ‘हा’ संघ आहे अजूनही अजेय)

साखळी स्तरावर सर्व संघांना 14-14 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचे अजून 10-10 सामने शिल्लक असून दोन्ही चॅम्पियन संघ अजूनही या स्पर्धेत दमदार पुनरागमन करू शकतात. येथून आता एकही चूक संघाला महागात पडू शकते. टी-20 लीगच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने पहिले तीन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर मुंबईसाठी हे चित्र काही वेगळे नाही. आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या सीएसके संघाला कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर संघाला लखनऊ सुपर जायंट्स, तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या पंजाब किंग्स आणि चौथ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पराभवाची धूळ चारली.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सची अवस्थाही चेन्नई सारखीच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभव केला आणि त्यांची सुरुवात खराब केली. यानंतर त्यांना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडूनही पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर चौथ्या सामन्यात आरसीबी संघाने 7 विकेटने पराभवाची चव घेण्यास भाग पाडले. एकेकाळी केकेआरविरुद्ध मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर होती, पण पॅट कमिन्सच्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाताने मुंबईच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.