IPL 2022 Mega Auction:  मुंबई इंडियन्सने ‘या’ फलंदाजावर केला कोट्यवधींचा वर्षाव, श्रेयस अय्यरच्या पुढे जाऊन ठरला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू
ईशान किशन (Photo Credit: PTI)

युवा यष्टिरक्षक ईशान किशन (Ishan Kishan) युवराज सिंह नंतर दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएल लिलावाच्या (IPL Auction) पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला 15.25 कोटी रुपयांना परत विकत घेतले. किशन त्याच्या मूळ किमतीच्या 2 कोटी रुपयांच्या 7 पट जास्त किंमतीत विकला गेला. किशन त्याच्याभोवती संघ तयार करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाला अतिरिक्त लवचिकता प्रदान करतो. किशनने सर्व टप्प्यांमध्ये 130 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे आणि ऑफ-स्पिन व्यतिरिक्त सर्व गोलंदाजी विरुद्ध त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. किशनसाठी मुंबईचा संघ सर्वांशी लढताना दिसला.विकेटकीपर-फलंदाज त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि विकेटकीपिंगमध्येही हा खेळाडू एमएस धोनीसारखा चपळ आहे. (IPL 2022 Auction Marquee Players: शिखर धवनला बंपर फायदा, कमिन्स-अश्विनला नुकसान, जाणून घ्या किती किमतीला विकले मार्की खेळाडू)

आयपीएल मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने किशनला रिटेन न करता रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरोन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. लिलावापूर्वी स्टार भारतीय विकेटकीपर दिनेश कार्तिकने निदर्शनास आणून दिले की किशनच्या पहिल्या चेंडूपासून फटके खेळण्याची क्षमता त्याला एक दुर्मिळ खेळाडू बनवते. किशनची बोली दोन कोटी रुपयांपासून सुरू झाली. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद यांनी त्यांच्यासाठी बोली लावली. अखेरीस किशनचा विक्रमी 15.25 कोटी रुपयांत पुन्हा समावेश करण्यात मुंबई फ्रँचायझी यशस्वी ठरली.

यासह, युवराज सिंहचा विक्रम अबाधित राहिला. युवी 16 कोटींसह लिलावात विकत घेतलेला सर्वात महागडा भारतीय होता. किशनला घेण्यासाठी मुंबईने गुजराज टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादला मागे टाकत आतापर्यंत लिलावातील मोठी बोली लावली आहे. 23 वर्षीय ईशान किशनचा टी-20 मध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने 104 डावात 28 च्या सरासरीने 2726 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाचा स्ट्राइक रेट 135 आहे, जो टी-20 च्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. यामुळे 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने त्याच्यावर एवढी मोठी बोली लावली.