Players Withdraw from IPL 2022: नवीन आयपीएल (IPL) फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. LSG चा स्टार खरेदी मार्क वुड (Mark Wood) आयपीएल 2022 मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. वूड सध्या इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर (England Tour of West Indies) आहे आणि इंग्लंडच्या संपूर्ण कॅरिबियन दौऱ्यातून त्याच्यावर बाहेर पाडण्याचे संकट ओढवले आहे. लखनऊ सुपर जायंट्सने वूडला तब्बल 7.5 कोटी रुपयात खरेदी केले होते. लक्षात घ्यायचे की गेल्या 7 दिवसात इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी आधीच आयपीएलमधून माघार घेतली आहे. जेसन रॉय (Jason Roy) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) या दोघांनी बायो-बबल थकवा संबंधित समस्यांचा हवाला देऊन स्पर्धेतून पाय मागे घेतला आहे. रॉयला गुजरात टायटन्स तर हेल्सला कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात खरेदी करून संघात सामील केले होते. (IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्समध्ये अॅलेक्स हेल्सची जागा घेतली अॅरॉन फिंचने)
प्रत्येक आयपीएल हंगामापूर्वी, काही स्टार खेळाडू त्यांच्या स्वतःच्या कारणांमुळे लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. आणि या हंगामात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळणार आहे. आयपीएलची नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सने मेगा लिलावात जेसन रॉयला त्याची मूळ किंमत, 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण त्याने विस्तारित बायो-बबलचा हवाला देत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसांनी नाईट रायडर्सने लिलावात मूळ किमतीत 1.5 कोटीत करारबद्ध केलेल्या इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज हेल्स देखील टी-20 लीग सुरु होण्यापूर्वीच बाहेर पडला. अॅलेक्स हेल्सने यापूर्वी बिग बॅश आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये मागील चार महिने परदेशात प्रतिबंधात्मक बायो-बबलमध्ये घालवले आणि त्याच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, हेल्स आणि रॉय यांच्या उलट अलीकडे झालेल्या दुखापतीमुळे वुड स्पर्धे बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र वूड स्पर्धेबाहेर पडल्यास केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सना मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, आयपीएलच्या आगामी 15 व्या हंगामासाठी वूडच्या खेळण्यावर येत्या काही दिवसात निर्णय होऊ शकतो.