IPL 2022, LSG vs KKR: आयपीएल (IPL) 2022 च्या 53 व्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) विजयाची मालिका सुरू ठेवली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 75 धावांनी पराभव केला. लखनौ संघाचा हा 8 वा विजय ठरला असून केकेआरला (KKR) 7 व्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. केकेआरसमोर विजयासाठी 177 धावांचे मोठे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात कोलकाता संघ पूर्ण 20 ओव्हर देखील खेळू शकला नाही आणि 14.3 षटकांत अवघ्या 101 धावांत गारद झाला. कोलकात्याच्या स्टार अष्टपैलू आंद्रे रसेलचे (Andre Russell) एकटी झुंज दिली आणि सर्वाधिक 45 धावा केल्या. या पराभवासह श्रेयस अय्यरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे.(IPL 2022, LSG vs KKR: KL Rahul डायमंड डकचा ठरला बळी, लखनौ मार्गदर्शक गौतम गंभीरच्या ‘त्या’ पराक्रमाशी बरोबरी)
केकेआरवरील विजयाने लखनौने प्लेऑफसाथीची आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. LSG संघाचे 11 सामन्यात 16 गुण असून पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. गुजरात टायटन्ससह लखनौचे देखील 16 गुण झाले असून नेट रनरेटने केएल राहुलच्या सुपर जायंट्सने गुजरातला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. याशिवाय कोलकाता तितक्याच सामन्यात 7 सामने गमावून गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौकडून क्विंटन डी कॉकने सार्वधिक 50 धावा केल्या. तसेच दीपक हुडाने 41, मार्कस स्टॉइनिसने 28 आणि कृणाल पांड्याने 25 धावांचे योगदान दिले. केकेआरकडून आंद्रे रसेलने दोन तर सुनील नरेन, टीम साऊथी आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुसरीकडे, लखनौची विजयी घोडदौड सुरु ठेवण्यात क्विंटन डी कॉकनंतर गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आवेश खान आणि जेसन होल्डर 3-3 विकेट घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. तर रवी बिष्णोई, दुष्मंथा चमीरा आणि मोहसीन खान यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयसने पहिल्याच षटकात कर्णधार राहुलला धावबाद करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. राहुल खतेही उघडू शकला नाही. तथापि यानंतर डी कॉक (50) आणि दीपक हुडा (41) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. चांगल्या सुरुवातीनंतर मार्कस स्टॉइनिस (28) आणि जेसन होल्डर (13) यांनी डावाचा समारोप केला. दोन्ही फलंदाजांनी मिळून 19 व्या षटकात 5 षटकार ठोकले.